वाहतुकीचे नियम मोडणे गुन्हा आहे. आता तर नियम मोडल्यास एवढा भलामोठा फाईन मारला जातो की याद्वारे ट्रॅफिक पोलिसांना जास्तीचे तोडपाणी मिळू लागले आहे. एखाद्याने नियम मोडला, किंवा त्याला थांबविले तर आता पोलीस त्यांच्या खासगी मोबाईलमध्ये देखील त्या वाहनाचा फोटो काढू शकत नाहीत, असा नियम आहे. परंतू, बऱ्याचदा पोलीस फोटो काढून वाहनचालकांना घाबरविण्याचा, त्यांच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. यावर पोलीस प्रशासनानेच वेळोवेळी पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. असाच प्रकार एका सजग टेम्पो चालकाने पकडला आहे.
खाजगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश २०२२ मध्येच देण्यात आले होते. परंतू, तरीही अनेक पोलीस खासगी फोनमध्ये फोटो काढून त्यावर फाईन घेतात किंवा एवढा दंड लागेल, तेवढा दंड लागेल असे सांगत पैसे उकळतात. ई-चलन मशीन असल्याशिवाय पोलीस आता तुमचे चलन करू शकत नाहीत. परंतू, मुंबईतील एका उड्डाणपुलावर वाहतूक पोलीस असे प्रकार करताना सापडले आहेत.
एका टेम्पोचालकाला त्यांनी थांबविले होते. वाहतूक पोलिसांचा सहाय्यक असलेल्या ट्रॅफिक मार्शलने या टेम्पोचा फोटो काढला. हे पाहून टेम्पोच्या चालकाने व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आणि त्याला जाब विचारला. गाडीचा फोटो का काढला, असे विचारले असता त्याने आधी दुर्लक्ष केले. परंतू, तुमच्याकडे मशीन नाही का, असे विचारताच त्या पोलिसाने त्याला पैशे, पैशे कसे पैशे असे न ऐकल्यासारखे बोलायला सुरुवात केली. पुढे पुन्हा चालकाने त्या पोलिसाला मशीन नाही तर फोटो कसा काढला असा सवाल केला, आता आपण पकडले गेलो हे समजल्यावर ट्रॅफिक मार्शलसोबत असलेल्या खाकी वर्दीतील पोलिसाने त्याला तो डिलीट कर आणि मिटव अशा भाषेत प्रकरण मिटविण्यास सांगितले.
यानंतर त्या मार्शल पोलिसाने ड्रायव्हरकडे येत त्याला फोटो दाखविला व डिलीट करत असल्याचे सांगत तो डिलीट केला. हा व्हिडीओ त्या ट्रक ड्रायव्हरने मुंबईतील एका चॅनलला पाठविला, यावर आता मुंबई पोलिसांचा रिप्लाय आला असून हे प्रकरण संबंधीत विभागाकडे पाठविले असल्याचे त्यात म्हटले आहे. या व्हिडीओवर लोकांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. यात ते वाहतूक पोलीस कशी लूट करतात याचा पाढाच वाचताना दिसत आहेत.