VIDEO : शेतीत कल्याण साधणारी ‘कल्याणी’!
By Admin | Updated: October 20, 2016 13:05 IST2016-10-20T08:48:20+5:302016-10-20T13:05:33+5:30
शिकलेली आई, घर पुढे नेई' असे म्हटले जाते. अकोला जिल्ह्यातील सिंदखेड मोरेश्वर गावातील एका शिकलेल्या आईने आपले घरच नाही तर आपली शेती अन गावालाही समोर नेले

VIDEO : शेतीत कल्याण साधणारी ‘कल्याणी’!
नीलिमा शिंगणे, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २० - 'शिकलेली आई, घर पुढे नेई' असे म्हटले जाते. अकोला जिल्ह्यातील सिंदखेड मोरेश्वर गावातील एका शिकलेल्या आईने आपले घरच नाही तर आपली शेती अन गावालाही समोर नेले. कल्याणीताई सोनोने असं या महिलेचं नाव. विदभार्तील शेतकरी आत्महत्यांच्या अस्वस्थेतून शेतीकडे वळलेल्या कल्याणीताई यांनी आज आपल्या शेतीतील वेगवेगळ्या अन नाविन्यपूर्ण प्रयोगातून यशस्वी भरारी घेतली. विशेष म्हणजे एम.ए. इंग्रजी असे उच्चशिक्षण घेतलेल्या कल्याणीताई यांनी प्राध्यापकाची नोकरी नाकारत खेड्यात राहून शेतीला एक नवी ओळख दिली.
बाशीर्टाकळी तालुक्यातील सिंदखेड मोरेश्वर गाव.गावातील किसनराव सोनोने पंचक्रोशीतील मोठे प्रस्थ. सोनोने कुटुंबीयांकडे १०२ एकर शेती. मात्र शेतीचा व्याप जास्त असल्याने हे कुटुंब पारंपारिक शेती करायचे. त्यातच नुकतीच शेती सांभाळायला लागलेला मुलगा अनिल यांचे शिक्षणही सुरु होते. अशातच एम.कॉम. पर्यंत शिक्षण झालेल्या अनिल यांचा विवाह १९८८ मध्ये अकोला जिल्ह्यातील बोरगाव खुर्द येथील माया गावंडे या तरुणीशी झाला. इंग्रजी साहित्यातील एम.ए. पदव्युत्तर शिक्षण झालेल्या 'माया गावंडे' सासरी आता 'कल्याणी सोनोने' झाल्या होत्या. अशातच अकोल्यातील काही नामांकित महाविद्यालयांकडून कल्याणीताईंना प्राध्यापकपदाच्या नोकरीसाठी बोलावणे आले होते. मात्र. त्यांना काहीतर्री नवीन करून दाखविण्याची आस लागली होती. त्यामुळेच त्यांनी अकोल्यात राहायचे नाकारत गावातच राहणे पसंत केले. मजुरांच्या भरवशावर पारंपारिक शेतीतून सोनोने कुटुंबियांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. १९९५ पासून कल्याणीताईंनी शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली होती. दरम्यान पत्नी कल्याणी यांना मदत करण्यासाठी पती अनिल यांनीही आपल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नोकरीचा राजीनामा देत शेती करण्याचे ठरविले. एका सुखवस्तू कुटुंबातील शिकलेली सून शेती करते यावर काहींनी नाकेही मुरडली तर काहींनी टोमणेही मारले. पण कल्याणीताईंनी आपली दिशा ठरवून घेतली होती. त्यांचा शेतीचा प्रवास २००० सालानंतर एका वेगळ्या वळणावर येवून ठेपला. कारण या दशकातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कल्याणीताईंना अस्वस्थ करून गेल्यात. अन येथूनच त्यांच्या काहीतरी नवीन करून दाखविण्याचे धेय्य ठेवलेल्या प्रयोगशील शेतीचा जन्म झाला.
आपल्या वाट्यावर आलेल्या ३७ एकर शेतीला कल्याणीताईंनी आपल्या पतीच्या मदतीने अगदी 'रिझल्ट' देणारी प्रयोगशाळाच बनविली. आधी आपल्या शेतीचा अभ्यास करून आपल्या जमिनीत कोणती पिके येवू शकतात याचा अभ्यास कल्याणीताईंनी केला. राज्यात आणि देशातातील शेतीतील नवीन प्रयोग पाहण्यासाठी त्यांनी पतीसोबत राज्य आणि देशाचा काही भाग पालथा घातला. आता कल्याणीताईंना आपल्या कामाची दिशा मिळाली होती. सर्वात पहिले त्यांनी आपल्या शेतात 'शेड-नेट'मध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली. पण त्या फक़्त लागवडीवरच थांबल्या नाहीत. तर त्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सातत्य यातून ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले. अन २००७ मध्ये जिल्ह्यातील पहिले व्यावसायिक 'शेड-नेट'उभारले. बिगरहंगामी भाजीपाला घेण्याची सोय त्यातून निर्माण झाली होती. यानंतर त्यांनी आपल्या शेतात 'मल्चिंग' पद्धतीने कापसाची लागवड केली. यातून त्यांनी मागील वर्षी एकरी तब्बल २९.६० क्विनटल कापसाचे उत्पन्न घेतले. यावषीर्ही त्यांनी कापसासह टरबूज व ढोबळी मिरचीवर मल्चिंग प्रयोग केला. याशिवाय शेतातच त्यांनी गांडूळ खत निर्मिती सुरु केली. त्यासोबतच फुलशेतीचा पर्याय निवडत शेतात झेंडूची लागवड केली. यावर्षी कांदा, भेंडी या पिकांचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविला. तर लवकी आणि काकडीचे उत्पादनही यावर्षी त्यांनी घेतले. हे सर्व करतांना त्यांनी उन्हाळ्यातील पिकांसाठी पाण्याची आवश्यकता लक्षात घेत त्यांनी आपल्या शेतात शेत-तळेही तयार करून घेतले. त्यामध्ये नदीचे पाणी पाईपलाईन टाकून सोडण्यात येते.
कल्याणीतार्इंन्ना शेतकरी आत्महत्यांच्या अस्वस्थेतून शेती करण्याचे बळ मिळाले, त्याच शेतकऱ्यांच्या घरातील महिलांसाठी 'राधाई' या नावाने बचत गट सुरु केले. आज कल्याणीताई महिला बचत गटाच्या बाशीर्टाकळी तालुक्याच्या समन्वयक आहेत. त्यांच्या या कामाला आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा 'उद्यान पंडित पुरस्कार', पुसदच्या वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा 'कृषी गौरव पुरस्कार' आदी अनेक पुरस्कारांनी गौरविले.सध्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार परिषद आणि जिल्हा 'आत्मा' समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.