VIDEO- शेतीच्या मालासाठी शेतकऱ्यांचे वाहन ठरते गाढव!
By Admin | Updated: September 1, 2016 19:13 IST2016-09-01T19:08:29+5:302016-09-01T19:13:24+5:30
शेतातून शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकरी बैलबंडी, ट्रॅक्टर व अन्य साधनांचा वापर करतात.

VIDEO- शेतीच्या मालासाठी शेतकऱ्यांचे वाहन ठरते गाढव!
गोवर्धन गावंडे/ऑनलाइन लोकमत
हिवरखेड, दि. 1 - शेतातून शेतमाल घरी आणण्यासाठी शेतकरी बैलबंडी, ट्रॅक्टर व अन्य साधनांचा वापर करतात. परंतु, हिवरखेड येथील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून शेतमाल आणण्यासाठी स्वातंत्र्य काळापासून चांगला रस्ता नसल्यामुळे आजही शेतातून शेतमाल घरी आणण्यासाठी गाढवांचा उपयोग करावा लागतो.
हिवरखेड परिसरातील मुंजावार हा रस्ता पावसाळ्यामध्ये चार महिने चिखलयुक्त असतो. त्या रस्त्याने पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे, खते न्यावे लागतात. तसेच पीक आल्यानंतर मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन आदी पिके घरी आणण्यासाठी वा शेतात नेण्यासाठी मागील ५० वर्षांपासून गाढवाचा वाहन म्हणून उपयोग करावा लागतो. शेती रस्त्यावर बैलबंडी वा ट्रॅक्टरचा उपयोग होत नाही. या परिसरात १०० हेक्टर शेती असून, संबंधित शेतकऱ्यांना पेरणीपासून तर शेतमाल घरी आणण्यासाठी जून ते सप्टेंबरपर्यंत गाढवांचा उपयोग करावा लागतो.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरसुद्धा ही परिस्थिती बदलेली नाही. मागील कित्येक वर्षांपासून या परिसरातील शेतकऱ्यांना विविध कार्यालयाच्या चकरा मारून त्यांच्या हाती फक्त निराशा आली. तरी या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना वनवासातून मुक्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता करूनसुद्धा त्याचा काहीच फायदा झालेला नाही. पाणी-पाऊस वाढल्यास शेतकऱ्यांचा शेतातील माल पावसात भिजतो व खराब होतो. त्याला त्याचा योग्य भाव मिळत नसल्याचे एकंदरित चित्र पहावयास मिळत आहे.