VIDEO : शेतजमिनीसाठी शेतकऱ्याचे शोलेस्टाईल आंदोलन
By Admin | Updated: June 20, 2017 18:45 IST2017-06-20T18:45:55+5:302017-06-20T18:45:55+5:30
ऑनलाइन लोकमत उस्मानाबाद, दि. 20 - वाशी तालुक्यातील वडजी येथील एका ७५ वर्षीय शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील झाडावर ...

VIDEO : शेतजमिनीसाठी शेतकऱ्याचे शोलेस्टाईल आंदोलन
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 20 - वाशी तालुक्यातील वडजी येथील एका ७५ वर्षीय शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील झाडावर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले़ साधारणत: अर्धा ते पाऊण तास झाडावर थांबलेल्या शेतकऱ्याने प्रशासनाच्या कारभारावर राग व्यक्त करीत सातबारा दुरूस्त करून न्यायालयाच्या निकालाप्रमाणे शेती नावावर करून देण्याची मागणी केली़.
वाशी तालुक्यातील वडजी येथील शेतकरी माणिक विश्वनाथ मोराळे (७५, ह़मु़ देवळाली ढो़ ताक़ळंब) यांच्या वडिलांच्या नावे वडिलोपार्जित जमीन आहे़ मात्र, गावातील गावगुंडांनी तत्कालीन तलाठी व इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून सातबाऱ्यावरील आपले नाव कमी करून स्वत:चे नाव लावल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याने केला आहे़ या प्रकरणात प्रशासन दप्तरी, न्यायालयीन प्रकरणात खेटे मारून थकलेल्या शेतकऱ्याने अखेर आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला होता़ प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे शेतकरी माणिक मोराळे हे मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले़ कार्यालयाच्या प्रवेशद्वारातील एका झाडावर चढून त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला़ घटनास्थळी आलेले सपोनि दिगंबर शिंदे, हातमोडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत काढली़ त्यावेळी संबंधित शेतकऱ्याने आपली व्यथा मांडून प्रशासनावरील राग व्यक्त केला़ शेताच्या सातबाऱ्यावर बेकायदेशीर झालेला फेरफार दुरूस्त करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली़ उपस्थित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करा, न्याय मिळेल, असे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी झाडावरून खाली उतरून अधिकाऱ्यांशी संवाद साधला़.
न्यायालयात पाठपुरावा करा
झाडावरून उतरलेले शेतकरी मोराळे यांच्याशी ़अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी संवाद साधला़ कार्यालयीन प्रकरणे निकाली निघाले असले तरी उच्च न्यायालयात सुरू असलेले एक प्रकरण निकाली निघणे गरजेचे आहे़ आपण न्यायालयात सातत्याने लढा दिला आहे़ शेवटच्या टप्प्यात हे प्रकरण असल्याने तुम्ही लढा द्या, तुमच्या बाजूने निकाल लागेल, असा सल्लाही दिला़ शिवाय न्यायालयात प्रकरण असल्याने आत्महत्येसारखा मार्ग अवलंबू नका, असेही ते म्हणाले़.