VIDEO- पुलाअभावी थर्माकॉलवरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
By Admin | Updated: August 28, 2016 16:59 IST2016-08-28T16:59:53+5:302016-08-28T16:59:53+5:30
पाटोदा तालुक्यातील कुसळंब परिसरातील वाड्यावस्त्यांलगत असलेल्या तलावात पाणी साठल्याने नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड झाले आहे.

VIDEO- पुलाअभावी थर्माकॉलवरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 28 - पाटोदा तालुक्यातील कुसळंब परिसरातील वाड्यावस्त्यांलगत असलेल्या तलावात पाणी साठल्याने नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड झाले आहे. पुलाअभावी नागरिकांना चक्क चप्पूचा आधार घ्यावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही स्थिती निर्माण होत असताना पूल बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे.
कुसळंबपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लांबरवाडी परिसरात वाड्यावस्त्या स्थिरावलेल्या आहेत. कृष्णा खोऱ्यांतर्गत मोठा साठवण तलाव झाल्याने वाड्यावस्त्यांच्या चोहोबाजूने पाणी साठत आहे. त्यामुळे वस्ती आणि गावाचा संपर्क तुटला असून, ग्रामस्थांना चप्पूवर थर्माकॉल अंथरून प्रवास करावा लागत आहे. एवढेच नाही तर शेळ्या, लहान-लहान जनावरे, किराणा सामान, चारा आदी वस्तूंचेही यावरूनच ने-आण केली जाते. तलावाच्या दोन्ही टोकांना दोरखंड बांधला असून, त्याआधारे विद्यार्थी शाळेत मार्गस्थ होत आहेत.
नागझरी वस्ती, मालेवस्ती, केकाणवस्ती, आजबेवस्ती, खिळेवाडीवस्ती, वाल्हेकरवस्ती येथील ग्रामस्थांना हे रोजचे काम झाले आहे. दोन वर्षांपूर्वीही अशीच अवस्था असताना शेतातून चारा घेऊन येत असताना दोन महिला पाण्यात बुडल्या होत्या. त्यापैकी अनिता देविदास लांबरूड यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर शोभा आप्पासाहेब लांबरूड यांना ग्रामस्थांमुळे जीवदान मिळाले होते. संपूर्ण वस्त्यांना तलावाचे पाण्याने वेढले असल्याने नागरिकांना रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनाही अशीच कसरत करून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. पूल उभारण्याची मागणी वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांनी केली आहे.
तलावामुळे पाणीसाठा आहे, मात्र पूल नसल्याने जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना रोजचा प्रवास करावा लागत आहे. यासंबंधी प्रशासनाला वेळोवेळी कळवून देखील दुर्लक्ष झालेले आहे. लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. पूल बांधून ग्रामस्थांची व्यवस्था करावी.