VIDEO : पुण्यात भेसळ रॅकेट उध्वस्त
By Admin | Updated: June 26, 2017 22:26 IST2017-06-26T22:26:48+5:302017-06-26T22:26:48+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे : तुम्ही जर डेअरींमधून सुटे तूप आणि लोणी (बटर) खरेदी करीत असाल तर सावधान...तुम्ही हॉटेल्स, स्नॅक्स ...

VIDEO : पुण्यात भेसळ रॅकेट उध्वस्त
ऑनलाइन लोकमत
पुणे : तुम्ही जर डेअरींमधून सुटे तूप आणि लोणी (बटर) खरेदी करीत असाल तर सावधान...तुम्ही हॉटेल्स, स्नॅक्स सेंटर आणि हातगाडीवर पावभाजी वा अन्य खाद्यपदार्थ खात असाल तर सावधान...कारण तुमच्या प्लेटमध्ये असलेले तूप आणि बटर ह्यभेसळीह्णचे असण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कोंढव्यातील एका कारखान्यावर छापा टाकून बनावट तूप व बटर तयार करणा-या टोळीला गजाआड केले आहे. याठिकाणी तीन खोल्यांमध्ये भेसळीचा गोरखधंदा सुरु होता.
कोंढव्यातील गोकुळनगरमध्ये बनावट तूप तयार केले जात असल्याची माहिती पथकाचे सहायक फौजदार संभाजी भोईटे यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांसह छापा टाकला. या तीन खोल्यांमध्ये मोठ मोठ्या पिंपांमध्ये बटर आणि तूप भरुन ठेवण्यात आलेले होते. यासोबतच मोठ्या पातेल्यांमध्ये तूप, बटर गरम करण्याचा उद्योगही सुरु होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट तूप होत असल्याचे पाहून पोलिसही अचंबीत झाले. तूप, सोयाबीन तेल आणि वनस्पती तूप (डालडा) समप्रमाणात एकत्र करुन तुपाची भेसळ केली जात होती. तर दुधाचे क्रिम, पाणी आणि सोयाबीन तेल एकत्र करुन त्यापासून बनावट लोणी तयार केले जात होते. या पदार्थांची शहरातील विविध हॉटेल्स आणि डेअरींमध्ये विक्री केली जात होती. या रॅकेटने शहरातील जवळपास सोळा डेअरींमध्ये या मालाची विक्री केली आहे. त्याची यादी पोलिसांच्या हाती लागली असून त्यामध्ये सिंहगड रस्ता, मार्केट यार्ड, कात्रज, कोंढवा, घोरपडी पेठ, भारती विद्यापीठ, न-हे, कर्वेनगर, धायरी येथील डेअरींचा समावेश आहे. आतापर्यंत या टोळीने जवळपास वीस लाखांचे पदार्थ शहरात विकले आहेत. एक वर्षापासून याठिकाणी बेकायदेशीरपणे हा व्यवसाय सुरु होता.
पोलिसांनी केसरसिंग रुपसिंग राजपूत (वय २८), शेरसिंग रामसिंग राजपूत (वय २६), गंगासिंग सुखसिंग राजपूत (वय ३०, सर्व रा. श्री सद्गुरु स्वामी समर्थ बिल्डींग, गोकुळनगर, कोंढवा) यांना अटक केली आहे. हे सर्वजण दोन वर्षांपासून याठिकाणी राहून बनावट तुप तपार करीत होते. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई केल्यानंतर शहरात असे भेसळीचे आणखी किती कारखाने असतील याचा शोध घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वास्तविक अशा व्यवसायांवर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. या टोळीने शहरातील अनेक हॉटेल्स आणि डेअरींमध्ये हा बनावट माल विकला आहे. केवळ २४० रुपये किलोने डेअरीमध्ये तूप विकले जाते. डेअरीमधून हेच बनावट तूप ४०० ते ४५० रुपये दराने ग्राहकांना विकले जात आहे. हॉटेल्समध्ये, स्नॅक्स सेंटरमध्ये रोटी, नान, पावभाजी आदी पदार्थांवर घालण्यात येणारे लोणी (बटर) भेसळीचे नसेलच याची खात्री देता येत नसल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.
विशेषत: हातगाडीवर आणि बाहेरील पदार्थ खाताना ग्राहकांच्या प्लेटमधील बटर आणि तूप भेसळीचे नाही ना याची खात्री करण्याची आवश्यकता आहे. कारण अनेकदा स्वस्तात मिळते म्हणून व्यावसायिक अशा भेसळीच्या पदार्थांवर ग्राहकांना संतुष्ट करतात. चव उत्तम लागत असल्याने ग्राहकांनाही त्याचा संशय येत नाही. मात्र, भेसळीचा हा गोरखधंदा करुन व्यावसायिक ग्राहकांच्या आरोग्याशी आणि प्रसंगी जिविताशी खेळ करीत असल्याचे चित्र आहे.
ही कारवाई उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील, सहायक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील यांच्या पथकाने केली.
बनावट तूप आणि बटर तयार करणा-या टोळीकडून शहरातील डेअरींची नावे समोर आली आहेत. या डेअरींमधील मालाची तपासणी केली जाणार असून त्यांचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये भेसळ असल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- संजय शिंदे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
डेअरींची यादी
सोमेश्वर डेअरी - सिंहगड रस्ता
सद्गुरु डेअरी - सिंहगड रस्ता
रामकृष्ण डेअरी - सिंहगड रस्ता
ओसाडजाई डेअरी - सिंहगड रस्ता
श्रीनाथ डेअरी - कात्रज
विश्वनाथ डेअरी - सुखसागर नगर
चामुंडा स्विट्स - सुखसागर नगर
हरिओम डेअरी - कात्रज
कृष्णा डेअरी - कोंढवा
पुना डेअरी - घोरपडी पेठ
ओम डेअरी - भारती विद्यापीठ
गणेश डेअरी - न-हे
समर्थन डेअरी - कर्वेनगर
भवानी स्विट्स - धायरी