VIDEO- नवरदेवाप्रमाणेच नवरीची वरात मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 22:49 IST2017-02-08T22:49:13+5:302017-02-08T22:49:13+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 8 - लग्नाच्या आदल्यादिवशी नवरदेवाची वरात मिरवणूक निघत असते हे आपण पाहिलेले व ऐकलेले आहे. ...

VIDEO- नवरदेवाप्रमाणेच नवरीची वरात मिरवणूक
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 8 - लग्नाच्या आदल्यादिवशी नवरदेवाची वरात मिरवणूक निघत असते हे आपण पाहिलेले व ऐकलेले आहे. परंतु कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील एका कुटुंबाने चक्क नवरीची वरात मिरवणूक काढून मुलगा मुलगी समान या शासनाच्या उपक्रमाला अस्तित्वात उतरविले आहे. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे नवरदेवाची वरात निघते, त्याचप्रमाणे ही वरात काढण्यात आली. या घटनेची चर्चा जिल्हाभर पसरल्यानंतर त्या कुटुंबीयांचे कौतुक केले जात आहे.
कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील बेंदरे परिवाराने मुलीचे मंगलकार्य दारव्हा येथील नारिंगे परिवारासोबत ठरले. मुलाच्या लग्नाच्या आदल्यादिवशी जशी वरात काढण्यात येते, त्याचप्रमाणे या नवरी मुलीचीही वरात काढण्यात आली. बेंदरे परिवारातील रेखाताई व नारायण आप्पा बेंदरे यांची सुकन्या भाग्यश्री हिचा विवाह सोहळा दारव्हा येथील विकास आप्पा नारिंगे यांच्या मुलासोबत संपन्न झाला.
यानिमित्ताने लग्नाच्या आदल्या दिवशी सायंकाळी बेंदरे परिवाराने आपल्या कन्येची गावातून डीजेच्या तालावर वरात मिरवणूक काढून शासनाच्या लेक शिकवा लेक वाचवा, मुलगा मुलगी एक समान या शासनाच्या उपक्रमाला प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले. या प्रकाराची जिल्हाभर कौतुक होत असल्याने सदर बाब बुधवारी उघडकीस आली.
ज्या प्रमाणे मुलगा हा वंशाचा दिवा आहे, त्याचप्रमाणे मुलगी ही वंशाची पणती आहे. माझ्या पतींनी हा निर्णय घेतला की मुलाप्रमाणे आपल्या मुलीची सुद्धा वरात काढावी व तो मलाही आवडला. मुलगा व मुलगी समान असल्याचे दाखवून दिले.
- रेखाताई बेंदरे