VIDEO : बहुजन क्रांती मोर्चासाठी अकोल्यातील बहुजन एकवटले
By Admin | Updated: January 15, 2017 20:31 IST2017-01-15T20:01:33+5:302017-01-15T20:31:25+5:30
ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 15 - बहुजनांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध जिल्ह्यातील सर्व बहुजन समाज एकवटला असून, रविवारी अकोला क्रिकेट ...

VIDEO : बहुजन क्रांती मोर्चासाठी अकोल्यातील बहुजन एकवटले
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 15 - बहुजनांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध जिल्ह्यातील सर्व बहुजन समाज एकवटला असून, रविवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. अत्यंत शिस्तबद्धतेने क्रिकेट क्लबवरून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या ठिकाणी उपजिल्हाधिकाºयांना मोर्चेकरी महिलांनी निवेदन दिले.
रविवारी सकाळी ११ वाजतापासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली. मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी विचारपीठावरून बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्यासह एमपीजेचे शहजाद, अन्वर, अॅड. सी.ए. दंदी, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष सातव, राजेश जावरकर, आसिफ खान, रोहिणी निखाडे, भूमिहिनांचे नेते भाई जगदीश इंगळे, आदिवासी नेते प्रकाश खुळे, कोळी समाजाचे शिवप्रकाश भांडे, गजानन गिºहे, मिलिंद इंगळे, गणेश परतुरकर व प्रा. प्रकाश सावळे आदींनी मोर्चात सहभागी झालेल्या बहुजन समाजाला मार्गदर्शन केले. लेजीम आणि डफड्याचा ताल आणि सरकारविरोधी घोषणा देत, बहुजन क्रांती मोर्चाला अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सुरुवात झाली. हातामध्ये मागण्यांचे फलक आणि हिरवे, पिवळे, भगवे, निळे ध्वज घेऊन मोर्चा निघाला. हा मोर्चा टॉवर चौकातून मार्गक्रमण करीत हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकात पोहोचला. तेथून हा मोर्चा गांधी रोड मार्गे पंचायत समिती कार्यालयासमोरून होत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात सहभागी झालेल्या महिला, युवती, युवकांनी, एकच पर्व, बहुजन सर्व..., घटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाºयांचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर निवडक महिलांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली. मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. अकोला क्रिकेट क्लब मैदानावरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाजूकराव अदमे यांनी केले.
मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय
बहुजन क्रांती मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चाच्या अग्रस्थानी महिला होत्या. मोर्चामध्ये महिला, तरुणी, लहान मुले आणि वृद्ध महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. घोषणा देणाºया मोर्चातील महिलांनी लक्ष वेधून घेतले.
{{{{dailymotion_video_id####x844oez}}}}
मूलनिवासी जागृती जत्थ्याने जागविली स्फूर्ती
मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर मूलनिवासी जागृती जत्थ्याने स्फूर्तिदायक गीते सादर केली. जत्थ्यातील देवेंद्र कि. सिरसाट, गजानन वाकोडे, सुरेश वाकोडे, मारोती वानखडे, रामभाऊ वानखडे, सुरवाडे आदी कलावंतांनी विविध गीते सादर करून मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या बहुजन समाजामध्ये आत्मविश्वास जागविला.
महिला, युवतींनी दिले निवेदन
मोर्चात सहभागी झालेल्या महिलांपैकी मंगला थोरात, अर्चना इंगळे, प्रवीणा भटकर, रेखा बुटे, वंदना अवचार, विजया जंजाळ, प्रतिभा इंगोले, नलिनी गावंडे, छाया लोंढे व ज्योती काळे आदींनी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन दिले.
बहुजन क्रांती मोर्चाच्या मागण्या
अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून कायदा अधिक कडक करावा, राज्यात ठिकठिकाणी महिला, युवतींवर अत्याचार करणाºया आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा करावी, ओबीसींसाठी असलेली क्रिमिलेअरची असंवैधानिक अट तत्काळ रद्द करावी, मंडल कमिशन, सच्चर कमिशन व नच्चीपन कमिशनच्या शिफारशी लागू कराव्यात, एससी, एसटीप्रमाणेच ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण द्यावे, भटके विमुक्त जाती, जमातींना अॅट्रॉसिटी कायद्याद्वारे संरक्षण द्यावे, मुस्लिमांना सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, २००५ पासून नियुक्त कर्मचाºयांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, जे लोक एससी, एसटीमधील लोक इतरांच्या प्रभावाखाली येऊन अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करतात, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, स्पर्धा परीक्षेत मेरिट विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच खुल्या प्रवर्गात नेमणूक द्यावी, मुस्लीम पर्सनल लॉमध्ये बदल करू नये यांसह इतर महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.