शहांच्या संघात विदर्भाची पाटी कोरी
By Admin | Updated: August 17, 2014 00:44 IST2014-08-17T00:44:42+5:302014-08-17T00:44:42+5:30
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत संघ भूमी नागपूरसह विदर्भातील पक्षाच्या नेत्यांना संधी मिळू शकली नाही.

शहांच्या संघात विदर्भाची पाटी कोरी
नागपूर: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत संघ भूमी नागपूरसह विदर्भातील पक्षाच्या नेत्यांना संधी मिळू शकली नाही.
अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी नागपूरला भेट देऊन सरसंघचालकांशी प्रदीर्घ चर्चा केली होती. त्यामुळे त्यांच्या संघात नागपूरसह विदर्भातील नेत्यांना स्थान मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पक्षाकडे संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांची फळीही असल्याने यापैकी काहींना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संघी शहा देतील अशीही चर्चा होती. यातूनच विदर्भातील काही नेत्यांची नावेही पुढे आली होती. मात्र कार्यकारिणीत त्याचे प्रतिबिंब उमटले नाही.
पक्षाचे ज्येष्ठ नेते व नागपूरचे खासदार नितीन गडकरी हे सध्या केंद्रात मंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रदेश भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी आहेत. त्यामुळे कदाचित नागपूरचा विचार झाला नसावा असा पक्षात मतप्रवाह आहे. मात्र विदर्भातील इतर जिल्ह्यात पक्षाकडे ज्येष्ठ नेते मंडळी आहेत. स्वतंत्र विदर्भाचीही मागणी सध्या जोरात आहे. भाजपचाही त्याला पाठिंबा आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील नेत्यांना कार्यकारिणीत सामावून घेऊन विदर्भाला न्याय देण्याची भूमिका घेता आली असती, त्यातून एक वेगळा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला असता,अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. दरम्यान राष्ट्रीय कार्यकारिणी तयार करताना नेतृत्वाला राज्यांचा समतोल साधावा लागतो. त्यात राज्यांतर्गत विभागांचा विचार होत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून चार जणांचा समावेश करण्यात आला आहे, याकडे एका नेत्याने लक्ष वेधले. नागपूरला संघ मुख्यालय असल्याने भाजपमध्ये या शहराला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळेच नागपूर किंवा विदर्भातील नेत्यांचा समावेश कार्यकारिणीत अपेक्षित होता, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)