विदर्भ माझा पक्ष निवडणूक लढविणार - नगर परिषदेपासून सुरुवात
By Admin | Updated: May 16, 2016 20:33 IST2016-05-16T20:33:30+5:302016-05-16T20:33:30+5:30
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी झालेल्या विचारमंथनात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लोकशाही पद्धतीने पुढे नेण्यासाठी विदर्भ माझा हा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विदर्भ माझा पक्ष निवडणूक लढविणार - नगर परिषदेपासून सुरुवात
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १६ : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी झालेल्या विचारमंथनात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लोकशाही पद्धतीने पुढे नेण्यासाठी विदर्भ माझा हा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी विदर्भाच्या मुद्यावर आगामी ६० नगर परिषद, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढविल्या जातील, अशी घोषणा पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी केली.
तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लोकांना विदर्भ हवा आहे. त्यासाठी लोक एकत्र येऊन मतदानाच्या माध्यमातून ताकद दाखविण्यास तयार आहे. मात्र, काही पक्षांकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेचे पाठबळ मिळविण्यासाठी विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भासाठी आंदोलन करणाऱ्या बहुतांश सामाजिक संघटनांनी पक्षाला निवडणूक लढविण्यासाठी पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भाच्या चळवळीसाठी, विकासासाठी काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. यासाठी ग्रामीण भागात, तालुका पातळीवर विदर्भवाद्यांच्या मदतीने पक्ष बांधणीवर भर देण्यात आला आहे.
१९ मे रोजी विदर्भ राज्य संकल्प दिवस
- विदर्भवादी जनतेतर्फे १९ मे हा दिवस ह्यविदर्भ राज्य संकल्प दिवसह्ण म्हणून पाळला जातो. स्वतंत्र विदर्भाचे खंदे समर्थक व महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विदर्भवादी हा दिवस साजरा करतात. या वर्षीही या दिवशी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शहरे व ग्रामीण भागात लोक विदर्भ राज्य मिळविण्याचा जाहीर संकल्प घेतील. नागपुरातील तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रम होईल. विदर्भभर हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल.