विदर्भ हवाच
By Admin | Updated: August 22, 2014 01:36 IST2014-08-22T01:36:34+5:302014-08-22T01:36:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी वर्धा रोडवरील अजनी चौकात मानवी साखळी तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष

विदर्भ हवाच
विदर्भवाद्यांनी वेधले पंतप्रधानांचे लक्ष : आंदोलनकर्ते तीन तास पावसात
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी वर्धा रोडवरील अजनी चौकात मानवी साखळी तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले आणि स्वतंत्र विदर्भ राज्य देऊन भाजपाने आपले आश्वासन पाळावे, अशी मागणी केली. पंतप्रधानांची प्रतीक्षा करीत आंदोलनकर्ते तब्बल तीन तास भरपावसात विदर्भाच्या घोषणा देत उभे होते, हे विशेष.
भाजपाने आपल्या भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच निवडणुकीतही भाजपाच्या नेत्यांनी सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदाच नागपुरात आले असता. त्यांचे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि भाजपाने दिलेले आश्वासन पाळण्याची मागणी करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात विविध विदर्भवादी संघटनांच्यावतीने गुरुवारी अजनी चौकात ५०० फुटाचा बॅनर घेऊन शेकडो कार्यकर्त्यांनी तब्बल अर्धा किमी लांब मानवी साखळी तयार केली होती. दुपारी ३ वाजेपासून आंदोलनकर्ते अजनी चौकात मानवी साखळी तयार करून होते. यादरम्यान विदर्भाच्या घोषणा देत विदर्भवाद्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी पावसानेही दमदार हजेरी लावली. पावसाची ये-जा सुरू होती. पोलिसांची तारांबळ उडाली परंतु आंदोलनकर्ते मात्र हटले नाही. त्यांनी पावसात उभे राहूनच विदर्भाच्या घोषणा सुरुच ठेवल्या. या मानवी साखळीद्वारे आंदोलनकर्त्यांनी अजनी रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता तीन तास अडवून ठेवला होता. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा विमानतळावरून कस्तूरचंद पार्ककडे जात असतानाच अजनी चौकातील या मानवी साखळीने त्यांचे लक्ष वेधले. पंतप्रधानांचे आगमन होताच आंदोलनकर्त्यांनीही विदर्भाचा आवाज बुलंद केला. तब्बल ३ तास विदर्भवादी भर पावसात विदर्भाचा आवाज बुलंद करीत उभे होते.
या आंदोलनात ज्येष्ठ नेते वामनराव चटप, राम नेवले, श्रीनिवास खांदेवाले, अॅड. नंदा पराते, प्रबीरकुमार चक्रवर्ती, डॉ. रमेश गजबे, अरुण केदार, दिलीप नरवडीया, प्रभात अग्रवाल, शेर खॉ पठाण, भीमराव फुसे, बाबुराव गेडाम, शैलाताई देशपांडे, शबीर शेख, बबलू पठाण, गणेश शर्मा, यांचा समावेश होता.
अश्वजित पाटील, अण्णाजी राजेधर, विवेक तिवारी, जगदीश बोंडे, रेखा पराते, मंजू पराते, अनिता हेडावू, शकुंतला वट्टीघरे, धनंजय केळापुरे, प्रभावती देवघरे, शालू नंदनवार, लता खापेकर आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
मस्के दाम्पत्याने वेधले लक्ष
विदर्भाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने चप्पल भिरकावणाऱ्या शोभा मस्के आणि त्यांचे पती बाबाराव मस्के दाम्पत्यसुद्धा या मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले होते. विदर्भ हा महाराष्ट्राच्या साखळदंडात कसा अडकून आहे, हे दर्शविण्यासाठी त्यांनी आपले अंग प्रतिकात्मक साखळदंडाने जखडून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
काँग्रेसने दाखविले काळे झेंडे
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने अजनी चौकात मानवी साखळी आंदोलन सुरू असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत आले. पंतप्रधान परत जा, अशा घोषणा देऊ लागले. त्यांच्या हातात काँग्रेसचा ध्वज होता. पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले व गाडीत बसवून नेले. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास काँग्रेसचे नाना झोडे, परमेश्वर राऊत, प्रवीण पोटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली.
सहपोलीस आयुक्तांसोबत आंदोलनकर्त्यांची बाचाबाची
दुपारी ३ वाजेपासून आंदोलनकर्ते शांततेने आंदोलन करीत होते. दरम्यान अचानक आंदोलनकर्ते रस्त्यावर आले. त्यांनी मानवी साखळी तयार करून अजनी रेल्वे स्टेशकडे जाणारा रस्ता रोखून धरला. तरीही आंदोलन शांततेत सुरू होते. काही वेळांनी सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना मागे करण्याचे पोलिसांनी निर्देश दिले. आंदोलनकर्ते थोडे मागे सरले. परंतु आणखी मागे होण्यास सांगण्यात येत असल्याने आंदोलनकर्ते चिडले. अटक करायची असेल तर करा पण मागे हटणार नाही, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका होती. त्यामुळे काही वेळ आंदोलनकर्ते व अनुकुमार सिंग यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती हे आंदोलनात सहभागी होते. त्यांनी मध्यस्ती केली. त्यानंतर आंदोलनकर्ते व पोलीसही शांत झाले.