विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन
By Admin | Updated: February 18, 2017 12:15 IST2017-02-18T05:32:52+5:302017-02-18T12:15:08+5:30
जांबुवंतराव धोटे यांचे येथे शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 18 - माजी खासदार विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांचे शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भावर शोककळा पसरली आहे.
ते स्वतंत्र विदर्भाचे खंदे समर्थक होते. सेवाग्राम ते नागपूर ही स्वतंत्र विदर्भासाठी पदयात्रा त्यांच्या नेतृत्वात अलीकडेच काढण्यात आली होती. ते १९७८ मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या बंडखोराचा पराभव केला होता.
१९८० मध्ये ते सातव्या लोकसभेत नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस (आय) सोडून विदर्भ जनता काँग्रेस हा स्वत:चा पक्ष ९ सप्टेंबर २००२ रोजी स्थापन केला. ते महाराष्ट्र विधानसभेवर पाच वेळा निवडून गेले होते. १९६२ ‘ध्ये यवतमाळ विधानसभेचे त्यांनी आमदार म्हणून नेतृत्व केले.
१९६७ ची निवडणूक त्यांनी फॉरवर्ड ब्लॉककडून लढवली. तर १९७८ ची निवडणूक ते काँग्रेस पक्षाकडून लढले. ते काँग्रेसचे नेते रामराव आदीक यांचे जावई होते. त्यांच्या पश्चात पत्नी माजी आमदार विजयाताई धोटे, दोन मुली क्रांती व ज्वाला, जावई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने विदर्भवादी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनावर समाजातील सर्वस्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
Maharashtra: Former MP Jambuwantrao Dhote, also known as 'The Lion of Vidharbha', passed away this morning at 3 AM in Yavatmal. pic.twitter.com/gGQZjP0DTe
— ANI (@ANI_news) February 18, 2017