वेळकाढूपणासाठीच विदर्भाचा मुद्दा
By Admin | Updated: August 5, 2016 05:31 IST2016-08-05T05:31:50+5:302016-08-05T05:31:50+5:30
विधिमंडळात विरोधकांनी इतर विषयांना हात घालू नये, म्हणून स्वतंत्र विदर्भाची आरोळी ठोकायची

वेळकाढूपणासाठीच विदर्भाचा मुद्दा
नाशिक : विधिमंडळात विरोधकांनी इतर विषयांना हात घालू नये, म्हणून स्वतंत्र विदर्भाची आरोळी ठोकायची आणि लक्ष दुसरीकडे वळवायचे, हाच भाजपाचा उद्योग सुरू आहे. वेळकाढूपणासाठीच स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर टीकास्त्र सोडले. मनसेची भूमिका अखंड महाराष्ट्राचीच असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
दोन दिवसांसाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर भाष्य केले. राज्यात इतरही अनेक महत्त्वाचे विषय समोर असताना आणि शिक्षण, आरोग्य यामध्ये गोंधळाची स्थिती असताना विधानसभेत या विषयांवर चर्चा होण्याऐवजी वेळकाढूपणासाठी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा केली जात आहे. राज्यात भाजपाच्या हाती सत्ता आहे. तर मग विदर्भाचा अनुशेष भरण्यासाठी आणि विकासासाठी यांना थांबविले कुणी, असा सवालही राज यांनी केला. विरोधकांनी इतर विषयांवर चर्चा करू नये म्हणून हा सारा गोंधळ सुरू आहे. भाजपा माध्यमांना आणि जनतेलाही खेळवत आहे. कॉँग्रेसही स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने बोलू लागली आहे. ही सारी मिलिभगत असल्याचा आरोप राज यांनी केला. (प्रतिनिधी)
>सरकारचा बेजबाबदारपणा
महाड येथील दुर्घटनेला सरकारचा बेजबाबदारपणी कारणीभूत असल्याचे राज यांनी सांगितले. लोकसंख्या जास्त झाल्यामुळे आता माणसांच्या मरणालाही किंमत राहिलेली नाही. पुलाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल ब्रिटिशांनीच पत्राद्वारे कळविले होते. त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. हा बेजबाबदारपणाच दुर्घटनेला कारणीभूत असल्याचे राज यांनी सांगितले.