विदर्भात चाराटंचाईचे चटके!

By Admin | Updated: February 15, 2016 02:05 IST2016-02-15T02:05:56+5:302016-02-15T02:05:56+5:30

मराठवाड्यात हिरवा चारा पाठवण्याची शक्यता.

Vidarbha feeding clutches! | विदर्भात चाराटंचाईचे चटके!

विदर्भात चाराटंचाईचे चटके!

अकोला : पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे यावर्षी राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, चार्‍याची टंचाई भासणार असल्याने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत वर्‍हाडातील पाच जिल्हय़ांत चारा लागवड करण्यात आली आहे. यातील काही हिरवा चारा दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाठवण्याची शक्यता आहे.
यावर्षी पावसाने पाठ फिरवली असून, पश्‍चिम विदर्भातील अनेक भागात पाऊस नसल्याने या भागातील गुरांच्या चार्‍यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यात चारा लागवडीवर भर देण्यात आला आहे. अकोला जिल्हय़ात डिसेंबर २0१५ पासून चारा लागवड हाती घेण्यात आली आहे. अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फतही (महाबीज) वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
दरम्यान, सलग पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत असून, मागील वर्षी चार्‍याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल भावात पशुधन विकण्याची पाळी आली होती. यावर्षी पुन्हा तेच चित्र निर्माण झाले आहे. परंतु कृषी विभागाने यावर्षी ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तेथे गतिमान वैरण विकास राबवला आहे. पूर्व विदर्भातही चारा लागवडीवर भर देण्यात आला आहे. मागीलवर्षी पाऊस नसल्याने विदर्भासह मराठवाड्यात भीषण दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात गुरांना चाराच नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर विदर्भातून काही हिरवा चारा मराठवाड्यात पाठवला जाणार आहे.

ज्वारी पेरा कमी झाल्याचा परिणाम
विदर्भातील खरीप व रब्बी ज्वारीचे उत्पादन घटल्याने त्याचा परिणाम पशू खाद्यावर झाला आहे. यावर उपाय म्हणून गतिमान वैरण कार्यक्रम राबविण्यात आला आहे; परंतु त्याचा फायदा किती होतो, याकडे पशूपालक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vidarbha feeding clutches!