भाजपाच्या दृष्टिपत्रातून विदर्भ गायब सेनेने आणला वचननामा
By Admin | Updated: October 11, 2014 06:22 IST2014-10-11T06:22:14+5:302014-10-11T06:22:14+5:30
अवघ्या चार दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपली असताना आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने आपले जाहीरनामे प्रकाशित केले

भाजपाच्या दृष्टिपत्रातून विदर्भ गायब सेनेने आणला वचननामा
मुंबई : अवघ्या चार दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपली असताना आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने आपले जाहीरनामे प्रकाशित केले. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजपाचे नेते विदर्भात मते मागत असले, तरी त्यांनी आज जारी केलेल्या दृष्टिपत्रातून विदर्भाचा मुद्दाच गायब आहे.
शिवसेनेने आपल्या वचननाम्यात मुंबईतील पूर्वकिनाऱ्याचा विकास, सागरी मुक्त मार्ग, सीआरझेडमध्ये सुधारणा, राज्यभर वारकरी भवन आणि डबेवाला भवनच्या निर्मितीवर भर देण्यात आल्याने हा वचननामा शहरी वळणाचा बनला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक, ग्रामीण जीवनासाठी इंद्रधनुष्य योजना आणि उद्योगांसाठी २४ तास वीजपुरवठा, अशी आश्वासने देखील शिवसेनेने दिली आहेत. भाजपाची राज्यात सत्ता आल्यास एलबीटी रद्द केला जाईल, टोल धोरणात आमूलाग्र बदल करून सामान्य नागरिकांची जाचातून मुक्तता केली जाईल, असे आश्वासन निवडणूक दृष्टिपत्रात देण्यात आले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत मात्र त्यात अवाक्षरही नाही.