विदर्भात बोगस खते व बियाण्यांची भरमार!
By Admin | Updated: June 1, 2015 01:42 IST2015-06-01T01:42:15+5:302015-06-01T01:42:15+5:30
बोगस खताचा साठा सापडल्यानंतर कृषी विभाग झाला जागा.

विदर्भात बोगस खते व बियाण्यांची भरमार!
अकोला : पश्चिम विदर्भात बियाण्यांचा काळाबाजार होत असून, अकोला जिल्हय़ातही यंदा अप्रमाणित सोयाबीनचे बियाणे विक ले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शनिवारी मूर्तिजापूर येथे बोगस खताचा साठा सापडल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली असून कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. पश्चिम विदर्भातील ही पहिलीच कारवाई आहे. गुणवत्ता नियंत्रण विभागाने ही कारवाई केली असली तरी बोगस बीटी कापसाचे बियाणे खुलेआम विकणार्यांवर केव्हा कारवाई होणार, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. पश्चिम विदर्भात अमरावती, यवतमाळ व इतर जिल्हय़ात गेल्यावर्षी अप्रमाणित, बोगस बियाण्यांचा साठा सापडला आहे. बोगस रासायनिक खतेही आढळून आली आहेत; गेल्यावर्षी आकोटात सोयाबनीचे बोगस बियाणे तयार करणारा चक्क कारखानाच निदर्शनास आला होता. यावर्षी मुर्तिजापुरात अकोला जिल्हा कृषी विभाग व गुण नियंत्रण विभागाच्या अधिकार्यांना बोगस खताचा साठा आढळून आला आहे. यंदा प्रमाणित सोयाबीन बियाण्यांची वाणवा असल्याने कृषी विभागाला अधिक दक्ष राहावे तर लागणारच आहे, शिवाय शेतकर्यांनादेखील काळजीपूर्वक बियाणे खरेदी करावे लागणार आहेत. दरम्यान, शनिवारी सापडलेला बोगस खताचा साठा या ठिकाणाहून किती प्रमाणात विकला गेला, हा मोठा प्रश्न असून, ही खते शोधून काढण्यासाठी अधिकार्यांची कसोटी लागणार आहे. लोकमत'ने यासंबंधी वारंवार कृषी विभागाला सतर्क केले आहे, हे विशेष. यासंदर्भात एस आर सरदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर्षी बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये म्हणून कृषी विभाग दक्ष असल्याचे सांगीतले. बीटी कापसाच्या बियाण्याची जेथे विक्री होत असेल, तेथे कृषी विभागाचा एक कर्मचारी राहणार आहे. बीटी बियाण्याची संपूर्ण आकडेवारी ठेवली जाणार आहे आणि अमरावती विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. बोगस खताची विक्री होऊ नये यासाठी कृषी विभाग दक्ष असल्याचा पुर्नउच्चार त्यांनी केला. कृषी विभाग बोगस बीटी विक्रेत्यांच्या मागावर आहे; परंतु शेतकर्यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल न चुकता घेणे गरजेचे आहे. कृषिसेवा केंद्रधारक पावती देण्यास नकार देत असेल, तर शेतकर्यांनी १८00२३-३४000 या क्रमांकावर संपर्क साधावा.