विदर्भात सरासरी ६५ टक्के मतदान
By Admin | Updated: October 16, 2014 00:57 IST2014-10-16T00:57:49+5:302014-10-16T00:57:49+5:30
विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले. काही जिल्ह्यांमध्ये सकाळी पाऊस असल्याने काही वेळ मतदानात खंड पडला होता. नंतर मात्र मतदान केंद्रांवर

विदर्भात सरासरी ६५ टक्के मतदान
नागपूर : विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले. काही जिल्ह्यांमध्ये सकाळी पाऊस असल्याने काही वेळ मतदानात खंड पडला होता. नंतर मात्र मतदान केंद्रांवर मतदारांची रिघ लागली. नागपूर जिल्ह्यातील बाराही विधानसभा क्षेत्रात सरासरी ६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तुरळक घटना वगळता जिल्ह्यात बुधवारी शांततेत मतदान पार पडले.
२००९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारीत दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र लोकसभेच्या तुलनेत मतदार यादीतील घोळाची टक्केवारी कमी करण्यात आयोगाला यश आले. नागपूर शहरातील मतदारांचा कौल लक्षात घेता निकालही धक्कादायक राहणार असल्याची शक्यता आहे.
नागपूर शहरातील झिंगाबाई टाकळी येथील मतदान केंद्रावर मनसे उमेदवाराचा निवडणूक अधिकाऱ्यासोबत वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काटोल मतदारसंघात पाच मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये दुपारी बिघाड निर्माण झाल्याने तसेच चार मतदान केंद्रांवर वीजपुरवठा खंडित झाल्याने मतदारांची तारांबळ उडाली होती.
रामटेक मतदारसंघातील पारशिवनी तालुक्यात येणाऱ्या आवळेघाट येथे मतदान केंद्रालगतच्या पानटपरीवर वीज कोसळल्याने पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली तालुक्याच्या ताडपल्ली मतदान केंद्राजवळ १०० ते २०० फुटांवर माओवाद्यांनी गोळीबार केला. १५ मिनिटे हा गोळीबार चालला. सदर घटना दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी घडली. त्याचवेळी पोलिसांनी तत्काळ गावातील एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याने या ठिकाणी ठेवण्यात आलेला शस्त्रसाठा व अॅम्बुश पोलिसांना दाखविले. त्यानंतर पोलिसांनी शस्त्र ताब्यात घेऊन हे मतदान केंद्र दुपारी १.१५ वाजताच बंद केले. तसेच धानोरा तालुक्यात बुधवारी मतदानाच्या दरम्यान पोलिसांनी राबविलेल्या शोध मोहिमेत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २३ किलो स्फोटक व अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली-चापलवाडा मार्गावर नाल्यालगत पोलिंग पार्टीला घेऊन परत येत असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. याचवेळी नक्षलवाद्यांनी स्फोटही घडवून आणला. ही घटना दुपारी ३ ते ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान सजन भारती (४०) हा जखमी झाला आहे. त्याला हेलिकॉप्टरद्वारे उपचारासाठी नेण्यात आले आहे. क्लेरेमोर माईन्स पायाला लागल्याने मांडी व पोटरीदरम्यान भारतींना गंभीर इजा झाली आहे. सदर जवान हा सीआरपीएफच्या १९७ बटालियनचा होता. यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलिसांना मारहाण तर एका ठिकाणी मतदान कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथे गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाला. तर दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी मतदान केंद्रावर माजी जिल्हा परिषद महिला सदस्याने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्यात राष्ट्रवादी समर्थित उमेदवार रवी राणा व खोडके समर्थकांमध्ये ठिकठिकाणी शाब्दिक चकमक उडाली. परंतु पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपाने तणाव निवळला. याबाबत पोलिसात तक्रार दाखल नाही. अमरावती मतदारसंघात काँग्रेसचे रावसाहेब शेखावत यांचे समर्थक उपमहापौर शेख जफर व अन्य दोन तर भाजपचे सुनील देशमुख यांचे समर्थक रफीक मौत व अन्य चार जणांना नागपुरी गेट पोलिसांनी स्थानबध्द केले होते. सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले. वर्धा जिल्ह्यात सिंदी रेल्वे येथे मतदान केंद्रावर घोषणाबाजी केल्याने सिंदी (रेल्वे) येथे एका भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदार संघात मतदारांना वाटप करण्यासाठी वाहनात नेण्यात येत असलेली ६० हजार ८०० रुपयांची रोकड डोंगरहळदी येथील बसस्थानकाजवळ जप्त करण्यात आली.