‘काँग्रेसने सहकार्य केल्यास वेगळा विदर्भ’
By Admin | Updated: October 27, 2014 02:11 IST2014-10-27T02:11:50+5:302014-10-27T02:11:50+5:30
भाजपा छोट्या राज्याच्या निर्मितीचा पुरस्कर्ता,काँग्रेसने सहकार्य केल्यास येत्या काळात स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल - गडकरी

‘काँग्रेसने सहकार्य केल्यास वेगळा विदर्भ’
गणेश वासनिक, अमरावती
भाजपा छोट्या राज्याच्या निर्मितीचा पुरस्कर्ता असून, काँग्रेसने सहकार्य केल्यास येत्या काळात स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी स्पष्ट केले.
गडकरी हे येथे एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामभवनात पक्षपदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा करताना स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट केली.
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची मागणी फार जुनी आहे. मात्र तेलंगणच्या धर्तीवर वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन किंवा उठाव करण्यात आला नाही. त्यामुळे शासनकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची मागणी गांभीर्याने घेतली नसल्याचे गडकरी म्हणाले. तेलंगण राज्य निर्मितीसाठी लोक रस्त्यावर उतरलेत.
आमदार, खासदारांनी राजीनामा सत्र चालविले. काहींनी आत्महत्या करून नव्या राज्य निर्मितीसाठी बलिदान दिले. त्यामुळे शासनकर्त्यांना स्वतंत्र तेलंगण राज्य निर्माण करणे भाग पाडले. परंतु वेगळ्या विदर्भाची मागणी जुनी असताना जनतेतून त्याकरिता जोराचा रेटा नाही. परिणामी वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेल्या राजकीय घडामोडींवर विचारणा केली असता गडकरींनी याविषयी भाष्य करणे टाळले. आपण दिल्लीत सेट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.