वडाळे तलावातील गाळाचे प्रकरण विधानसभेत
By Admin | Updated: July 31, 2016 02:18 IST2016-07-31T02:18:22+5:302016-07-31T02:18:22+5:30
ऐतिहासिक वडाळे तलावातून गाळ काढण्यात आला, मात्र त्यांचे वाढीव बिल लावण्यात आल्याचा आरोप होत आहे.

वडाळे तलावातील गाळाचे प्रकरण विधानसभेत
पनवेल : ऐतिहासिक वडाळे तलावातून गाळ काढण्यात आला, मात्र त्यांचे वाढीव बिल लावण्यात आल्याचा आरोप होत आहे. या विषयाचे पडसाद थेट विधानसभेत उमटले आहेत. विदर्भातील एका आमदाराने विधानसभेत प्रश्न मांडत या तलावातून नेमका किती गाळ काढला? हा गाळ चर्चेला आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. नेमका गाळ किती काढला, असे प्रश्न विचारत यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.
चिमाजी आप्पा आपले सैन्य घेऊन पनवेलला मुक्कामी होते, तेव्हा त्यांनी पनवेलकरांसाठी बक्षीस म्हणून बल्लाळेश्वर मंदिराच्या बाजूला विस्तीर्ण तलाव खोदून दिला. त्याला वडाळे तलाव म्हणून ओळखले जाऊ लागले. बाजूलाच अशोक बाग असल्याने या परिसराचे सौंदर्य अधिक खुलले होते. या तलावाद्वारे एकेकाळी पनवेल शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत होता. कालांतराने वडाळे तलावाकडे दुर्लक्ष होत गेले.
पनवेलमधील या सौंदर्यस्थळाच्या देखभालीकडे लक्ष न दिल्यामुळे या तलावावर संपूर्ण जलपर्णी पसरते. तळ्यालगत मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत असून, त्याचे सांडपाणीही तलावात सोडले जात असल्यामुळे हे पाणी दूषित झाले आहे. दूषित पाणी तसेच पुरेसा प्राणवायू व सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे या तलावातील शेकडो मासे तसेच अन्य जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. बाजूलाच असलेल्या बल्लाळेश्वर मंदिरात येणारे भाविक निर्माल्य आणि इतर वस्तू तलावात टाकतात. तसेच आजूबाजूचा कचरा तलावात जाऊन पाणी प्रदूषित होत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने किमान विसर्जन घाटापर्यंत गाळ काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्याकरिता पोकलेन, जेसीबी, डम्पर आणि मजूर असे चार ठेकेदार नियुक्त करण्यात आले. सुरुवातीला लोकसहभागातून हा गाळ काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर बिल लावण्यात आले. तलावातील नेमका किती क्युबिंग मीटर गाळ काढण्यात आला, याबाबत पालिकेकडे नोंद नाही. ५०० डम्पर गाळ काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. मात्र तलावातून गाळ काढून तो काठावर आणण्यात आला. त्यानंतर तो पायोनीअर आणि हरिओम नगरलगतच्या रस्त्यावर टाकण्यात आला. मात्र त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे तो पुन्हा उचलून दुसरीकडे टाकण्यात आला आहे. नियोजन नसल्याने याचा भुर्दंड पनवेल नगरपालिकेला बसला. वास्तविक पाहता जितके डम्पर दाखविण्यात आलेत, तितका गाळ काढण्यात आलेला नाही.
एका आमदाराने हा विषय विधानसभेत उठवल्यानंतर नगर परिषद याबाबत काय उत्तर देते, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)