मोदींचा विजय तोतयेगिरीतून --अवि पानसरे व्याख्यानमाला
By Admin | Updated: December 11, 2014 23:47 IST2014-12-11T23:32:45+5:302014-12-11T23:47:21+5:30
कुमार केतकर : व्याख्यानास उस्फूर्त प्रतिसाद

मोदींचा विजय तोतयेगिरीतून --अवि पानसरे व्याख्यानमाला
कोल्हापूर : प्रगतीच्या मूलभूत विचारांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘अच्छे दिन’ आणि ‘स्वच्छ भारत’ अभियानाची नौटंकी या देशात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय तोतयेगिरीतूनच झाला आहे. मोदींच्या नौटंकीचा इंटरव्हल वर्षभरानंतर होणार आहे. ‘अच्छे दिन’ अजूनही दिसत नाहीत; त्यामुळे जनतेने या नौटंकीतील तोतयेपण वेळीच उघडे पाडले नाही, तर या देशात अनपेक्षित स्थिती निर्माण होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.
श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने येथील शाहू स्मारक भवनमध्ये आज, गुरुवारी झालेल्या अवि पानसरे व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘लोकशाहीची वाटचाल’ हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते. व्याख्यानाचा उद्या समारोप आहे. सुमारे सव्वा तासाच्या व्याख्यानात केतकर यांनी भाजपचे सरकार सत्तेत कसे आले याची कारणमीमांसा केली. सोशल मीडियामुळे मोदींचा विजय झाला असे म्हणणे चुकीचे असून, त्यांचा विजय व्हावा यासाठी धर्मनिष्ठ विचारांची पेरणी दहा वर्षांपासून सुरू होती. त्याचेच फलित लोकसभा निवडणुकीत दिसले. साध्वी निरंजन ज्योती यांचे वक्तव्यदेखील याच विचारातून असल्याचे केतकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मोदींना मिळालेला विजय हा त्यांना दिग्विजयी ठरवीत नाही. स्वातंत्र्याच्या अगोदरपासून या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी भारतीयांनी स्वीकारलेल्या विचारांचा चक्काचूर या निवडणुकीत झाला. ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली कॉर्पोरेट भांडवलशाहीचे आणि आक्रमक हिंदुत्वाचे आव्हान भारतीय लोकशाहीपुढे आहे. निवडणूक काळात पाकविरोधी युद्धाची भाषा करणारे मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधीला बोलावतात, हा विरोधाभास जनतेने लक्षात घेतला पाहिजे. सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या फुटीरतावादाला खतपाणी घालण्याचे काम मोदींकडून सुरू आहे.
डॉ. जे. एफ पाटील म्हणाले, भारतीय लोकशाही चारित्र्य हरवत चालली आहे. घटनेने प्रस्तावनेत नमूद केलेल्या सामाजिक कराराचा भंगच होत आहे. राजकीय पक्षांनी साटेलोटे करून जनतेला फसविण्याचा खेळ करून राजकारणाची अल्पाधिकार बाजारपेठच केली आहे. व्याख्यान ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. सभागृहाच्या बाहेरही लोक उभे होते.