बळीराजा संकटात
By Admin | Updated: December 1, 2014 00:51 IST2014-12-01T00:51:39+5:302014-12-01T00:51:39+5:30
यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बुडाला आहे. जिल्ह्यातील ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी खोल गेली आहे.

बळीराजा संकटात
दुष्काळाच्या झळा : ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आत
नागपूर : यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बुडाला आहे. जिल्ह्यातील ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी खोल गेली आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रबी हंगामात पीक येण्याची शाश्वती नाही. या संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी आस हवालदिल शेतकऱ्यांना लागली आहे.
सोयाबीन, धान व संत्र्याचे पीक बुडाले आहे. कापसाला उतारा नाही, त्यातच कवडीमोल भावाने कापसाची खरेदी सुरू आहे. महसूल विभागाच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील १६४५ पैकी ५२५ गावांतील पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. पीकनिहाय सर्वेक्षणाचा अद्याप अहवाल आलेला नाही. या अहवालानंतर दुष्काळग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. पीकनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. परंतु या प्रक्रियेला बराच कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तातडीने मदत जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
गेल्यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे पिकांसोबच जमिनीची हानी झाली होती. मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली होती. जमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही सरकारकडून मदत मिळालेली नाही. खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत पंचनाम्याची गरज राहणार नाही. ज्या गावाची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे, अशा सरसकट सर्व गावांनाच दुष्काळी गावे जाहीर करून तेथे मदत केली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु ही मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पीक कापणी प्रयोगावरून नुकसानीचा अंदाज
पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावरून नुकसानीचा अंदाज काढला जातो. यात कृषी व महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची असते. खरीप हंगामातील हा अहवाल अद्याप यावयाचा आहे. सोयाबीनचा हंगाम संपला आहे. या पिकाच्या नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. धानाची काढणी पूर्णपणे व्हायची असून कपाशीचे पीक अद्याप उभे असल्याने या पिकाच्या कापणीचा अहवाल येण्याला विलंब आहे. या अहवालावरून पैसेवारी निश्चित केली जाते. यावरून दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेतला जातो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील शहरी भागातही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई भासणार आहे. यासाठी नगरपालिका आणि नगर पंचायतींना नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील नगर परिषदांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडून मदतीची गरज आहे.
दोन लाख हेक्टरातील पीक बुडाले
खरीप हंगामात जिल्ह्यात ५,०९,९१६ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यात कापूस १,५०,०००, सोयाबीन १,९२,५०० तर धानाची ८५,००० हेक्टर लागवड करण्यात आली होती. याचा विचार करता जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रातील पीक बुडाले आहे. रबी हंगामालाही याचा फटका बसला असून, १,४४,६३० पैकी ५,६८९३ हेक्टर क्षेत्रात रबी हंगामात पेरणी झाली आहे. यात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही.
पिण्याच्या पाण्याची समस्या
दरवर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ५०० ते ६०० गावांत कमी-अधिक प्रमाणात टंचाई भासते. यंदाच्या हंगामात पाऊ स कमी झाल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. उपायोजनांसाठी जिल्हा प्रशासनाला भरीव निधीची तरतूद करावी लागणार आहे.