बळीराजावर आभाळमाया
By Admin | Updated: July 11, 2016 05:55 IST2016-07-11T05:55:53+5:302016-07-11T05:55:53+5:30
जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी पुनर्वसु नक्षत्राचा मुहूूर्त साधत राज्यभर मुसळधार वर्षाव केला. नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला

बळीराजावर आभाळमाया
मुंबई : जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी पुनर्वसु नक्षत्राचा मुहूूर्त साधत राज्यभर मुसळधार वर्षाव केला. नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला असून, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दोन दिवसांपासून जलधारा बरसत आहेत. पुणे जिल्ह्यात संततधार, खान्देशात भिज पाऊस सुरू आहे. तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे विदर्भातील नद्यांना पूर आले असून, गोसेखुर्दचे ३३ दरवाजे उघडावे लागले. नाशिकमध्ये तर गोदावरी दोन वर्षांनंतर प्रथमच दुथडी भरून वाहू लागल्याने मराठवाड्यातील जनता सुखावली आहे.
राज्यात सर्वत्र दमदार पाऊस होत असून, गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पावसाचे जूनची सरासरी भरून काढली असून, अनेक ठिकाणी गतवर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे़
गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस
पडला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
गोदाकाठच्या गावांना इशारा
नाशिकमध्ये दिवसभरात १३३ मिमी पावसाची नोंद झाली. दोन वर्षांनंतर प्रथमच रविवारी गोदावरीला पूर आल्याने, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातही अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे.
विदर्भातही पूर; चौघे बुडाले
विदर्भातील नद्यांना पूर आले असून, जलाशय तुडुंब भरले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कारसह चार जण नाल्यात वाहून गेले. भामरागड पाण्यात गेले आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले.
मराठवाड्यात सर्वदूर पाऊस
नांदेड जिल्ह्यातील सहा गावांचा काही वेळ संपर्क तुटला.औरंगाबादसह हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यात संततधार सुरू असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेर
कोल्हापूरसह सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्गात रविवारी मुसळधार पाऊस झाला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले. कोयना धरणातील पाणीसाठ्यात पाच टीएमसीने वाढ झाली. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली.
गोदावरीला पूर आल्याने नाशिक येथील नदीपात्रातील दुतोंड्या मारुतीची मूर्ती रविवारी संध्याकाळी पाण्याखाली गेली. आजवर ज्या-ज्या वेळी मूर्ती पाण्याखाली गेली, त्या वर्षी भरपूर पाऊस होऊन गोदाकाठ सुजलाम् झाला होता. दोन वर्षांनंतर रविवारी ही घटना घडल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
नगर जिल्ह्यातील घाटघर, रतनवाडीसह भंडारदरा पाणलोटात व मुळा खोऱ्यातील हरिश्चंद्रगड परिसरात रविवारी अतिवृष्टी झाली . खडकवासला धरण
क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.