जेएनपीटीच्या विस्तारात १४ हेक्टर खारफुटीचा बळी
By Admin | Updated: February 12, 2015 05:41 IST2015-02-12T04:29:54+5:302015-02-12T05:41:22+5:30
एनपीटीच्या विस्तारांतर्गत तिसऱ्या टर्मिनलच्या वाढीव ३३० मीटर लांबीच्या टर्मिनलसाठी १४ हेक्टर खारफुटीचा बळी देण्यास राज्याच्या वन खात्याने मान्यता

जेएनपीटीच्या विस्तारात १४ हेक्टर खारफुटीचा बळी
नारायण जाधव, ठाणे
जेएनपीटीच्या विस्तारांतर्गत तिसऱ्या टर्मिनलच्या वाढीव ३३० मीटर लांबीच्या टर्मिनलसाठी १४ हेक्टर खारफुटीचा बळी देण्यास राज्याच्या वन खात्याने मान्यता दिली आहे़ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी यापूर्वी परिसरातील ६१५ हेक्टर खारफुटीचा बळी देण्यात आला आहे़ यात ६० हेक्टर खाडीचा समावेश आहे़ त्यापाठोपाठ आता १४ हेक्टर खारफुटीची जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे़ या निर्णयामुळे परिसरातील फ्लेमिंगोंंच्या अस्तित्वासह सागरी पर्यावरणावरही गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे़
मुंबई बंदराला पर्याय म्हणून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात न्हावा-शेवा गावाच्या हद्दीत जवाहरलाल नेहरू बंदर बांधण्यात आले़ तेथील वाढती वाहतूक पाहता तिसऱ्या टर्मिनलचा ३३० मीटर लांबीपर्यंत विस्तार करण्यात येत आहे़ याला मच्छीमारांसह पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना आता केंद्र सरकारच्या मान्यतेने राज्याच्या वन खात्याने येथील १४ हेक्टर खारफुटीची जमीन दिली आहे़ जेएनपीटीच्या संकल्पित क्षमतेपेक्षा जास्त ताण पडत असल्याने विस्तार करणे आवश्यक झाले आहे़ हा विस्तार राज्याच्या हिताचा असल्याने जेएनपीटीच्या मागणीनुसार केंद्राच्या परवानगीने ही १४ हेक्टर खारफुटीची जमीन वळती करण्यास मान्यता दिल्याचे याबाबतच्या आदेशात वन विभागाने म्हटले आहे़ जेएनपीटी आणि नियोजित विमानतळामुळे येथील मासेमारीसह सागरी पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे़ नवी मुंबई विमानतळासाठी वाघिवली येथील २६५ हेक्टर आणि कामोठे येथील ३१० हेक्टर खारफुटी आणि ६० हेक्टर क्षेत्राच्या खाडीचा बळी देण्यास वन विभागाने मान्यता दिली आहे़