'विको'चे सर्वेसर्वा गजानन पेंढरकर यांचे निधन
By Admin | Updated: October 8, 2015 13:03 IST2015-10-08T08:48:54+5:302015-10-08T13:03:34+5:30
विको'उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गजानन पेंढरकर यांचे प्रदीर्घ आजाराने परळमधील निवासस्थानी निधन झाले.

'विको'चे सर्वेसर्वा गजानन पेंढरकर यांचे निधन
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - 'विको' उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गजानन पेंढरकर यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. मराठी उद्योगक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणा-या पेंढरकर यांनी वयाच्या ८२व्या वर्षी परळमधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या पेंढरकर यांना काही दिवसांपूर्वी उपचारांसाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते, मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पेंढरकर यांच्यासारख्या प्रयोगशील उद्योगपतीच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रात हळळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गजानन पेंढरकर यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३४ साली झाला. अहमदाबादमध्ये फार्मसीची पदवी घेतल्यानंतर गजानन पेंढरकर यांनी १९५७ साली वडिलांच्या व्यवसायात सहभागी होत 'विको'च्या माध्यमातून आयुर्वेदाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर गेल्या ४५ वर्षांपासून ते संस्थापक व अध्यक्ष म्हणून 'विको' कंपनीची धुरा यशस्वीपणे सांभाळत होते. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही विकोची आयुर्वेदिक उत्पादने लोकप्रिय करून त्यांनी जागतिक स्तरावर भारताचा ठसा उमटवला.
हर्बल टूथपेस्ट, टूथपावडर, टर्मरिक स्किन क्रीम, हर्बल शेव्हिंग क्रीम, आयुर्वेदिक पेन रिलीप यांसारख्या वैविध्यपूर्ण उत्पादनांची मालिका 'विको'ने ग्राहकांसमोर पेश केली होती.