उपराष्ट्रपतींनी केली ग्रंथसंपदेची पाहणी
By Admin | Updated: September 25, 2014 06:12 IST2014-09-25T06:12:10+5:302014-09-25T06:12:10+5:30
अन्सारी यांनी मंगळवारी सोफिया महिला महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मनमोकळेपणे संवाद साधला

उपराष्ट्रपतींनी केली ग्रंथसंपदेची पाहणी
मुंबई : उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी तीन दिवसांच्या आपल्या मुंबई भेटीच्या शेवटच्या दिवशी दोनशे दहा वर्षे जुन्या असलेल्या एशियाटिक सोसायटीला आज भेट देऊन तेथील ग्रंथसंपदा, हस्तलिखिते, प्राचीन नाणी व वस्तू तसेच दुर्मीळ नकाशांचे निरीक्षण केले. या कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती दुपारी दिल्लीला रवाना झाले.
अन्सारी यांनी मंगळवारी सोफिया महिला महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मनमोकळेपणे संवाद साधला. या कार्यक्रमानंतर त्यांनी कुलाबा येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेला (टीआयएफआर) भेट दिली. या वेळी त्यांनी संस्थेतील प्राध्यापक आणि पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. डॉ. होमी भाभा यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा प्रवास दर्शवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनालादेखील त्यांनी या वेळी भेट दिली.
निव्वळ विज्ञानावर आधारित करिअरकडे देशातील जास्तीत जास्त बुद्धिमान लोकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची आणि या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळवून देण्याची मागणी या वेळी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी त्यांच्याकडे केली.
बुधवारी उपराष्ट्रपतींनी फोर्ट येथील दोनशे दहा वर्षे जुन्या असलेल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी येथील ग्रंथसंपदा, हस्तलिखिते, प्राचीन नाणी व वस्तू तसेच दुर्मीळ नकाशांचे निरीक्षण केले.
या वेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, संस्थेचे अध्यक्ष शरद काळे, डॉ. अनिल काकोडकर, प्रो. जे.व्ही. नाईक, डॉ. अरुण टिकेकर, न्या. सुजाता मनोहर, न्या. बी.एन. श्रीकृष्ण, डॉ. अशोक जामसंडेकर, डॉ. मीना वैशंपायन, डॉ. मंगला सरदेशपांडे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)