विधानसभेचे उपाध्यक्षपद रिक्तच
By Admin | Updated: March 1, 2017 05:54 IST2017-03-01T05:54:50+5:302017-03-01T05:54:50+5:30
राज्यात भाजपा-सेनेचे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त आहे.

विधानसभेचे उपाध्यक्षपद रिक्तच
मुंबई : राज्यात भाजपा-सेनेचे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त आहे. तब्बल २८ महिन्यांपासून हे पद रिक्त असणे हे पहिल्यादाच घडले आहे, अशी कबुली विधानमंडळ सचिवालयाने दिली आहे. विधानसभेतील कोणत्याही सदस्यांची अद्याप या पदावर निवड करण्यात आली नसल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष, त्याच्या नियुक्तीची पद्धत, निकषाबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये अनिल गलगली यांनी माहिती मागविली होती.
त्याबाबत त्यांना कळविण्यात आले आहे की, आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बारावी विधानसभा ८ नोव्हेंबर २०१४ मध्ये विसर्जित करुन तेरावी विधानसभा २१ आॅक्टोबर २०१४ पासून अस्तित्वात आली आहे. विधानसभेतील उपाध्यक्ष पद रिक्त आहे. त्याबाबत तसेच उपाध्यक्षांच्या बाबतीत भारतीय संविधानातील अनुच्छेद १७८ अंतर्गत प्रत्येक राज्याची विधानसभा, शक्य होईल तितक्या लवकर, विधानसभेच्या दोन सदस्यांना अनुक्र मे आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आणि अध्यक्षांचे किंवा उपाध्यक्षांचे पद रिक्त होईल तेव्हा तेव्हा, विधानसभा अन्य सदस्यास अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाईल. भारतीय संविधानातील अनुच्छेद १८० अंतर्गत अध्यक्षांचे पद रिक्त असताना, त्या पदाची कर्तव्ये उपाध्यक्षाला पार पाडावी लागतील. (प्रतिनिधी)