कुलगुरू निवड प्रक्रियेस सुरुवात
By Admin | Updated: March 1, 2017 05:38 IST2017-03-01T05:38:11+5:302017-03-01T05:38:11+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली

कुलगुरू निवड प्रक्रियेस सुरुवात
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष व अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ १५ मे रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी डॉ. काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली आहे. तसेच जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. उदयकुमार यारगट्टी, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची कुलगुरू निवड समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. मंगळवारी डॉ. काकोडकर यांच्यासह समितीच्या सदस्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली.
शासनातर्फे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. दिलेल्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाणनी करून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. डॉ. गाडे यांचा कार्यकाल संपण्यास आणखी अडीच महिन्यांचा कालावधी आहे. तत्पूर्वी नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न समिती करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)