ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे निधन

By Admin | Updated: September 2, 2016 06:29 IST2016-09-02T06:29:57+5:302016-09-02T06:29:57+5:30

ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. काही महिन्यांपासून ते नानावटी रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत होते.

Veteran labor leader Sharad Rao passes away | ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे निधन

ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. काही महिन्यांपासून ते नानावटी रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत होते. राव यांच्या पश्चात मुलगा शशांक, मुलगी शिल्पा आणि नातवंडे असा परिवार आहे.
कामगार क्षेत्रातील अनेक संघटित आणि असंघटित कामगारांच्या संघटनांचे नेतृत्व राव करत होते. म्युनिसिपल मजदूर युनियन, बॉम्बे लेबर युनियन, हॉकर्स युनियन, रिक्षामेन्स युनियन आदी संघटनांमार्फत ते महापालिका कर्मचारी, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक, बेस्ट कर्मचारी व कामगार अशा विविध कामगारांच्या संघटनांचे नेतृत्व करताना राव यांनी रस्त्यावर उतरून हजारो आंदोलने केली. दिवंगत कामगार नेते दत्ता सामंत यांच्यानंतर एकमेव लढवय्ये नेतृत्व म्हणून राव यांची ओळख होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या चळवळीतून तयार झालेले शरद राव हे देश आणि विदेश पातळीवरील कामगार संघटनांचेही पदाधिकारी होते. त्यांच्या जाण्याने उभ्या कामगार विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
शशांक राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा कॅनडाला वास्तव्यास असून शनिवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी त्या मुंबईत येतील. तोपर्यंत पार्थिव शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. शनिवारी शिल्पा आल्यानंतर सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत राव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी
त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. गोरेगावातील लिंक रोडशेजारील बांगुरनगरमधील जलनिधी सोसायटी येथील राहत्या घरापासूनच अंत्ययात्रेला सुरुवात होईल. दुपारी ओशिवरा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. (प्रतिनिधी)

कामगार चळवळीचे मोठे नुकसान
शरद राव यांच्या निधनाने संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे संघर्षशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. ते आपल्या संदेशात म्हणतात : कामगार-कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवित त्यांनी कामगारांचे प्रश्न व्यापक व्यासपीठावर मांडले. कामगारांच्या हिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणाऱ्या राव यांच्या निधनाने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Veteran labor leader Sharad Rao passes away