रेतीउपशामुळे वैतरणा रेल्वे पूल धोक्यात

By Admin | Updated: August 5, 2016 02:47 IST2016-08-05T02:47:48+5:302016-08-05T02:47:48+5:30

वैतरणा खाडी पात्रात संक्शन पंप आणि बोटीने बेसुमार रेती उपसा सुरुच असून त्यामुळे वैतरणा रेल्वे पूलाला धोका पोचण्याची शक्यता आहे.

Vetarna Railway Bridge threatened due to sandstorm | रेतीउपशामुळे वैतरणा रेल्वे पूल धोक्यात

रेतीउपशामुळे वैतरणा रेल्वे पूल धोक्यात


वसई : वैतरणा खाडी पात्रात संक्शन पंप आणि बोटीने बेसुमार रेती उपसा सुरुच असून त्यामुळे वैतरणा रेल्वे पूलाला धोका पोचण्याची शक्यता आहे. रेती उपशामुळे १ आॅगस्ट २०११ ला पूलाशेजारची जमीन तब्बल २५ फूट खोल सरकली होती. त्यानंतर या परिसरात रेती उत्खनन करण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच पूलाखालुन ट्रकच्या वाहतूकीला बंदी घालण्यात आली होती. मात्र, वैतरणा खाडीत बेसमुार रेती उपसा सुरुच असल्याने वैतरणा पुलाला धोका पोचण्याची शक्यता वाढली आहे.
वैतरणा खाडी आणि वैतरणा रेल्वे पूलाच्या परिसरात रेती उत्खननाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात संक्शन पंपाने मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन केले जात आहे. संक्शन पंप एकावेळी हजार ब्रास रेती उत्खनन करीत असल्याने यापरिसरातील किनारे खचले आहेत. याविरोधात रेती उत्पादन संघाने हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने संक्शन पंपाने रेती उत्खनन करण्यास बंदी घातली होती. मात्र, बंदी हुकुम झुगारून आजही दिवस-रात्र रेती उत्खनन सुरु आहे.
यामुळे वैतरणा रेल्वे पूलाला धोका असल्याची तक्रार केली जात होती. पण, कुणीही लक्ष न दिल्याने १ अ‍ेॉगस्ट २०११ रोजी वैतरणा पूलाशेजारील जमिन तब्बल २५ फूट खचली होती. एका मोटारमनच्या सावधानतेमुळे मोठा अपघात होण्यापासून रेल्वे बचावली होती. त्यानंतर तब्बल दहा दिवस रेल्वेने काम करून पूलाशेजारच्या भागात भराव करण्यात आला होता. पश्चिम रेल्वेचा वैतरणा नदीवरील हा रेल्वे पूल १९७० मध्ये बांधण्यात आला होता. गुजराथ राज्यात उत्तरेत जाणाऱ्या मार्गावरचा हा महत्वाचा आणि एकमेव रेल्वे पूल आहे. त्याला अपघात घडल्यास मुंबईचा उर्वरित भारताशी असलेला संपर्कच संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे त्याची तातडीने काळजी घेणे आवश्यक आहे.
>रेती उत्खनन आणि ट्रकची वाहतूक सुरुच
वैतरणा खाडी आणि पूलाजवळ दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा केला जातो. त्यानंतर ट्रकने ही रेती मुंबईकडे रवाना केली जाते. विशेष म्हणजे सुर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर रेती उत्खनन आणि वाहतूकीला बंदी आहे. मात्र, यापरिसरात हा नियमही धाब्यावर बसवण्यात आला आहे. धक्कादाक बाब म्हणजे पूलाखालुन ट्रक वाहतूकीला बंदी असतानाही दररोज शेकडो ट्रक रेती वाहतूक करताना दिसतात. विशेष म्हणजे याठिकाणी असलेल्या दोन पूलावर रेल्वे, आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांची गस्त असते.
कणेर पोलीस चौकी रेतीमाफियांचा अड्डा
वैतरणा पूलाला धोका पोचवणाऱ्या वाळू माफियांनी कणेर पोलीस चौकीच्या परिसरात आपला डेरा जमवला आहे. येथून रेती भरून येणारे ट्रक सहीसलामत मुंबई आणि परिसरात पोचवण्यासाठी रेतीमाफियांंची शेकडो माणसे मोटारसायकली आणि कार घेऊन कणेर पोलीस चौकीच्या परिसरात ठाण मांडून बसलेली असतात. वैतरणाहून आलेला ट्रक मोटार सायकल आणि कारच्या संरक्षणात मुंबईत सुखरूप पोचवण्याचे काम केले जाते.

Web Title: Vetarna Railway Bridge threatened due to sandstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.