महिलांच्या स्वच्छतागृहात चक्क पुरुषांची घुसखोरी
By Admin | Updated: May 21, 2016 03:53 IST2016-05-21T03:53:37+5:302016-05-21T03:53:37+5:30
महिलांसाठी स्वच्छतागृहे आहेत, तेथेही त्यांना पुरुषांच्या घुसखोरीचा सामना करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार खुद्द महापालिकेच्या कार्यालयातच अनुभवास आला

महिलांच्या स्वच्छतागृहात चक्क पुरुषांची घुसखोरी
जान्हवी मोर्ये,
डोंबिवली- स्वच्छतागृहांसाठी-राइट टू पी साठी महिलांचा लढा सुरू असताना जेथे महिलांसाठी स्वच्छतागृहे आहेत, तेथेही त्यांना पुरुषांच्या घुसखोरीचा सामना करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार खुद्द महापालिकेच्या कार्यालयातच अनुभवास आला आहे. त्यातून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली ही शहरे स्वच्छ करण्याची मोहीम सुरू असताना ती राबवणाऱ्या पालिका कार्यालयातील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेकडे आणि पाण्याची काटकसर सुरू असतानाच्या काळात गळक्या नळांच्या दुरुस्तीकडे लक्ष पुरवले जात नाही, हे विशेष.
महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात तळ मजल्यावरील स्वच्छतागृहाला पूर्वी कुलूप असे. मात्र, ते वारंवार तोडले जाते. शेजारी असलेल्या पुरुषांच्या स्वच्छतागृहाला लागून असलेल्या महिलांच्या स्वच्छतागृहात पुरुष घुसतात. त्यातही सायंकाळनंतर तेथे अंधार असतो. कडीही तोडण्यात आली आहे. त्यामुळे हे स्वच्छतागृह महिलांसाठी असुरक्षित बनले आहे. गुरुवारी सायंकाळी महापालिकेतील महिला कर्मचारी शैलजा मोरे, अमिता वरळीकर स्वच्छतागृहात गेल्या, तेव्हा स्वच्छतागृहात घुसलेल्या पुरुषांमुळे मोठा गोंधळ उडाला. सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेतली. शैलजा मोरे म्हणाल्या, स्वच्छतागृहाला पूर्वी कुलूप होते. ते तोडले जाते. स्वच्छतागृहाला आतून कडी नाही. स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याने त्याचा वापर करण्याची इच्छा होत नाही. महिला सुरक्षारक्षक पुष्पा मेहेकरकर म्हणाल्या, स्वच्छतागृहातील नळ नीट बंद केले जात नाहीत. त्यामुळे पाणी तुंबते.
सुरक्षारक्षक रामदास शिंदे यांनी सांगितले, काही वेळा पालिकेबाहेरील लोकही स्वच्छतागृहात येतात. बस स्टॉप व पालिका शाळेच्या बाजूला स्वच्छतागृह आहे. त्याचा वापर केला जात नाही. स्वच्छतागृहात जाण्यास कोणाला मज्जाव करणार? केवळ महिला स्वच्छतागृहच नाही, तर पुरुषांची स्वच्छतागृहेही अस्वच्छ आहेत.
या घटनेबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही. पण, असे काही होत असल्यास त्यावर उपाययोजना करू. स्वच्छतागृहाच्या मेंटेनन्सचे काम जे करतात, त्यांच्याशी बोलून नळ दुरुस्त करून घेऊ, असे ग प्रभाग क्षेत्र अधिकारी मधुकर शिंदे यांनी सांगितले.
महिला स्वच्छतागृहात पुरुष घुसल्याची घटना ठाऊक नसल्याचे सांगून क प्रभाग क्षेत्र अधीक्षक भरत जाधव म्हणाले, सुरक्षारक्षकांना सांगून सुरक्षा कडक क रू. स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीबाबत उपअभियंत्यांशी चर्चा करू, असे ते म्हणाले.