वरसावे पुलावर होणार आणखी पाच महिने कोंडी

By Admin | Updated: March 2, 2017 03:21 IST2017-03-02T03:21:33+5:302017-03-02T03:21:33+5:30

दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरु झाले

Versova bridge will be held for five more months | वरसावे पुलावर होणार आणखी पाच महिने कोंडी

वरसावे पुलावर होणार आणखी पाच महिने कोंडी


मीरा रोड : मागील सहा महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरु झाले आहे. सुमारे ४ ते ५ महिने काम सुरु राहणार असल्याने प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पाच पदरी नवीन पुलाच्या कामासाठी मागवण्यात आलेल्या निवीदा उघडल्या असून त्याचे कार्यादेशही लवकरच दिले जाण्याची शक्यता आहे.
वरसावे खाडीवरील जुन्या पुलाच्या गर्डरला मोठा तडा गेल्याने गेल्यावर्षी सप्टेंबरपासून जुन्या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. गर्डरला गेलेल्या तडयाची कशा पध्दतीने दुरुस्ती करावी यासाठी काथ्याकूट केल्यानंतर ब्रिटीश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेम (ट्रस) चा आधार दिला जाणार होता. या कामासाठी सुमारे दीड महिना लागण्याची शक्यता होती. परंतु मेरी टाईम बोर्डाने परवानगी नाकारल्याने दुसरा पर्याय शोधण्यात आला. आता ‘एक्सट्रनल प्रिस्ट्रेस्ड केबल’ द्वारे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच गर्डरच्या दुरुस्तीचे काम आयआरबीमार्फत सुरु करण्यात आले आहे. पुलाच्या अंतर्गत भागातून हे दुरुस्तीचे काम सुरु असून या कामाची मुदत १८ ते २० आठवड्यांची असली तरी काम मुदतीआधी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तरीदेखील दुरुस्तीचे काम पूर्ण व्हायला ४ ते ५ महिने लागणार असल्याने सध्या तरी वाहतूक कोंडी कायम राहणार आहे. दुरुस्तीनंतरही १५ टनापेक्षा जास्त अवजड वाहनांची वाहतूक मात्र जुन्या पुलाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने बंदच ठेवावी लागणार आहे.
सध्या जुन्या पुलावरुन फक्त चारचाकी व दुचाकी यांनाच प्रवेश असून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जेणे करुन दोन्ही पुलांवरुन १५ ते २५ मिनीटांच्या अंतराने एका बाजूने वाहने सोडली जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने सहा महिन्यांपासून प्रवासी त्रासले आहेत. अवजड वाहने भिवंडीमार्गे वळवण्याची अधिसूचना असतानाही ठाणे शहर व पालघर पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
२०१४ पासूुन खाडीवर आणखी एक पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. ४ सप्टेंबर २०१५ मध्ये नवीन पुलाच्या बांधणीसाठी निवीदा मागवल्या होत्या. हा प्रस्तावित पूल जुन्या पुलाच्या पश्चिम दिशेला बांधला जाणार आहे. ५ मार्गिकेचा पूल असून १६७ कोटी खर्च आहे. (प्रतिनिधी)
>पर्यावरण विभागाच्या परवानगीची प्रतिक्षा
भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून कांदळवन व सीआरझेड क्षेत्र असल्याने पर्यावरण विभागाची परवानगी अंतिम टप्प्यात आहे. पूल उभारणीसाठीच्या निविदा उघडण्यात आल्या असून छाननी करुन निविदेस मंजुरी मिळताच कामास सुरुवात होईल.

Web Title: Versova bridge will be held for five more months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.