वाहने चोरणाऱ्या टोळीला अटक
By Admin | Updated: July 20, 2016 02:51 IST2016-07-20T02:51:51+5:302016-07-20T02:51:51+5:30
चारचाकी गाड्या भाड्याने देण्याचा बहाणा करून त्या परस्पर विकणाऱ्या टोळीतील चौघांना कामोठे पोलिसांनी अटक केली आहे.

वाहने चोरणाऱ्या टोळीला अटक
पनवेल : चारचाकी गाड्या भाड्याने देण्याचा बहाणा करून त्या परस्पर विकणाऱ्या टोळीतील चौघांना कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ७३ लाखांच्या ३५ गाड्या हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकारामुळे कार चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
प्रवीण विजय खडकबाण व विश्वास मारु ती कदम यांनी खांदा वसाहतीत साई समर्थ टूर्स आणि ट्रॅव्हल्स या नावाने कार्यालय सुरू केले होते. या कार्यालयातून एक वर्षाच्या करारावर गाड्या भाड्याने देण्यात येत होत्या. गाड्यांचे करार करून महिन्याला ४० ते ४५ हजारांचे आमिष गाडी चालकाला दाखविले जात असे. महिन्याला भाडे मिळेल या लालसेपोटी गाडीमालक आपली कार भाड्याने देत असे. गाडी ताब्यात आल्यानंतर या टोळीकडून गाडीचे नंबर प्लेट बदलून, बनावट आरसी बुक व दस्तऐवज बनवून त्या गाड्यांची विक्र ी केली जायची. तसेच काही टी परमिट असलेल्या गाड्या खासगी केल्या जायच्या. मालकासोबत भाडे करार करून, नंतर खोटी कागदपत्रे बनवून गाडीची विक्र ी करणाऱ्या विकी दीपक गायकवाड (२५) कामोठे, विश्वास मारु ती कदम (२३) कामोठे, प्रवीण विजय खडकबाण (३५) खांदा वसाहत, मौसम आत्माराम पाटील (३३) भरोडी, भिवंडी यांना कामोठे पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्यांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून एकूण ३५ गाड्या हस्तगत केल्या असून आणखी कार लवकरच हस्तगत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली. या टोळीतील मंदार पाटील ऊर्फ सुशील महाडिक आणि नितीन डोंगरे हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.