VBA Prakash Ambedkar: इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप आरएसएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. १९९९ पासून सत्तेत आल्यापासून ॲंटी मुस्लिम भूमिकेचा स्टॅंड राहिलेला आहे. गोध्रा घडवण्यात आलेले आहे. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर अखलाक, शाबीर यांचे मॉब लिंचिंग केले जाते आणि त्याचे व्हीडिओ आपल्याला मिळतात. मुस्लिमांना साईड ट्रॅक करायचे हा भाजप आणि आरएसएसचा प्रयत्न आहे. मात्र, सौगात-ए-मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते. अशात हे राजकीयदृष्टीने केलेला हा कार्यक्रम आहे. देशातून २२ टक्के हिंदू बाहेर जाऊ पाहत आहे, अशात मतदार जात असल्याने हे कृत्य करत आहे. मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन चाललेले आहे. ही प्रेमाची नव्हे तर राजकीय भेट आहे, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला.
‘सौगात-ए-मोदी’वरून प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली असून, संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावरही स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. वाघ्या श्वानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली, ही कथा सत्य आहे. त्यामुळेच त्याचे स्मारक उभारण्यात आले आहे. माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढे श्वान असतात. वाघ्या श्वानाबाबत जे चालले आहे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले जे बोलत आहेत ते १०० टक्के चूक आहे. ती उडी घेतली ही कथा सत्य आहे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले होते. यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली.
CM फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी यावर काही बोलणार नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस यांना सांगेन की, तुम्ही मुख्यमंत्री आहेत. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, जो कुणी राजदंड हाती घेतो, त्याला राज्य चालवता आले पाहिजे. जो कायद्याला मानत नाही, त्याला आतमध्ये टाकण्याची संधी असली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावच्या वेळेस आत टाकले नाही, पाठिशी घातले आणि एका दृष्टीने बळ दिले. ती चूक आता पुन्हा करु नका, ही माझी अपेक्षा आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना संभाजी भिडे यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना, त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायचे नाही, असा टोला खोचक उद्धव ठाकरेंनी लगावला.