वाशिमच्या गोपालकांचा वंदे ‘गो’ मातरमचा नारा!
By Admin | Updated: July 24, 2016 14:24 IST2016-07-24T14:24:09+5:302016-07-24T14:24:09+5:30
पशूपालनाची आवड असणा-या वाशिम परिसरातील ४० शेतक-यांनी सामूहिकरित्या वंदे ‘गो’ मातरम् या नावाने गट स्थापन करून गीर गोवंशाच्या तब्बल १०० गार्इंचे संगोपन केले.

वाशिमच्या गोपालकांचा वंदे ‘गो’ मातरमचा नारा!
सुनील काकडे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २४ - पशूपालनाची आवड असणा-या वाशिम परिसरातील ४० शेतक-यांनी सामूहिकरित्या वंदे ‘गो’ मातरम् या नावाने गट स्थापन करून गीर गोवंशाच्या तब्बल १०० गार्इंचे संगोपन केले. यामाध्यमातून मिळणारे दुध, तूप, गोमुत्राच्या विक्रीतून या गोपालकांची आर्थिक सक्षमतेकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये वाशिमचा प्रकर्षाने समावेश होतो. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांमुळे अक्षरश: जेरीस आले आहेत. दुसरीकडे मात्र वाशिम परिसरातील ४० शेतक-यांनी सामूहिकरित्या प्रामुख्याने गुजरातच्या जंगलात वावरणा-या गीर गाईच्या संगोपनाची कास धरली.
यामाध्यमातून मिळणा-या दुधाची ६० रुपये प्रतिलिटरप्रमाणे विक्री केली जात असून गाईच्या शुद्ध तुपाला २,२५० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. याशिवाय गाईचे गोमूत्र आणि शेणखताच्या वापरामुळे जमीन कसदार बनत असल्याची माहिती वंदे गो मातरम् शेतकरी गटाचे प्रमुख रवि मारशेटवार यांनी दिली. या गटामध्ये पशूपालक दत्ता लोनसूने, बबनराव लोनसूने, इरामल्लू बत्तूलवार, विठ्ठलराव बरडे, संतोष कोरडे, सुभाष वारकड, अतुल रंगभाळ, प्रकाश बावणे, निरखी, पवन इंगोले यांच्यासह इतर ४० गोपालकांचा समावेश आहे.