धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वसईत स्वच्छता अभियान

By Admin | Updated: March 2, 2017 03:18 IST2017-03-02T03:18:05+5:302017-03-02T03:18:05+5:30

वसई तालुक्यातून ५३११ किलो ओला व ४७९६१ किलो सुका कचरा संकलित करण्यात आला.

Vasayet Sanitation Campaign on behalf of Dharmadhikari Pratishthan | धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वसईत स्वच्छता अभियान

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वसईत स्वच्छता अभियान


वसई : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात संपूर्ण वसई तालुक्यातून ५३११ किलो ओला व ४७९६१ किलो सुका कचरा संकलित करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत ६ हजार ४७९ सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने १ मार्च रोजी संपूर्ण देशातील सरकारी कार्यालयांच्या आवारात तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ही स्वच्छता मोहिम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत तथा डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आली होती.
प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची दखल घेवून भारत सरकारने नुकतेच २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारत सरकारचा पद्माश्री पुरस्कार घोषित केला आहे. प्रतिष्ठानच्या सौजन्याने मागील गेली अनेक वर्षे सतत व्यापक स्वरुपात स्वछता अभियान राबविण्यात येत असते. वसई तालुक्यातील अनेक गावांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमे अंतर्गत शहर व गावातील रस्ते, सरकारी कार्यालये अशा विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यासाठी स्वयंसेवकांना हात मोजे, मास्क, झाडू, ग्लोव्हज इत्यादि साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरविण्यात आली होती.
संपूर्ण तालुक्यातून ५३११ किलो ओला व ४७९६१ किलो सुका कचरा असा मिळून एकूण ५३ टन कचरा संकलित करण्यात आला. जमा केलेला कचरा सरकारी व महापालिकेच्या आणि खाजगी वाहनांतून डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहचवण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये वसई विरार विभागातील एकूण ६ हजार ४७९ सदस्य स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.
प्रतिष्ठानच्या सौजन्याने गेली अनेक वर्षे व्यापक स्वरुपात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून दि. १६ नोव्हें. २०१४ रोजीच्या स्वच्छता अभियानाची नोंद लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाज ऋणांची जाणीव ठेवून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सातत्त्याने अनेक समाजोपयोगी व समाजाभिमुख उपक्रम साकारत आलेले आहे. वृक्षारोपण आणि संगोपन, कालवे, सरोवरे, नद्या व धरणांमधील गाळाचा उपसा करणे, दुर्घटनाग्रस्त व्यक्तिंंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, शारीरिकदृष्टया अक्षम आणि मूक - बधिर व्यक्तिंंना आवश्यक अवयव आणि उपकरणांचे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप, निशुल्क आरोग्य निदान आणि उपचार, आरोग्य विषयक जनजागृती, रक्तदान शिबिरे, पाणपोयांची निर्मिती, बस थांब्यांवर निवाऱ्याची निर्मिती, स्पर्धा परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन आदि प्रतिष्ठानचे प्रमुख प्रकल्प आहेत.
सार्वजनिक स्वच्छतेचे वैयक्तिक जीवनातील महत्व सांगताना डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आवर्जून सांगतात की, सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचरयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरतेच मात्र त्याचसोबत विषमज्वर, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे साथीचे रोग पसरण्याचा धोका देखील असतो. तसेच अस्वच्छतेचे पर्यावरणावर हानिकारक परिणाम होतात. समाजामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी हाही प्रतिष्ठानचा प्रमुख हेतू असल्याचे म्हणत प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून स्वयंशिस्तीचा अंगीकार करावा असे म्हणत या मोहिमेतून स्वच्छ भारत अभियानामध्ये आपले एक अल्पसे योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत असल्याची भावना डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
वसई विरार शहर महापालिकेच्या आरोग्य विभाग तथा स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याबाबतची तयारी अतिशय मोलाची व फारच उत्साहवर्धक होती. (प्रतिनिधी)
>वाडा येथे स्वच्छतेचा मंत्र
वाडा: कुणाच्या हातात फावडे, तर कुणाच्या हातात झाडू, कुणाच्या हातात घमेले अश प्रकारे श्री सदस्य (दास) भक्तांनी आज महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त गावात स्वच्छता मोहिम राबविली.यात या गावाचा चेहरा मोहरा बदलून ते चकाचक करण्यात आले. या मोहिमेत सभापती मृणाली नडगे, निवासी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी, सरपंच उमेश लोखंडे, उपसरपंच रोहन पाटील यांच्यासह शेकडो श्री सदस्यांनी सहभाग घेवून नागरिकांना स्वच्छतेचा मंत्र दिला.

Web Title: Vasayet Sanitation Campaign on behalf of Dharmadhikari Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.