वासवानी पिता पुत्राने जमविली अपसंपदा
By Admin | Updated: September 25, 2014 01:41 IST2014-09-25T01:41:52+5:302014-09-25T01:41:52+5:30
पदाचा दुरुपयोग करून लाखोंची मालमत्ता जमविल्याप्रकरणी नागपूर सुधार प्रन्यासचा माजी अधीक्षक अभियंता नानक पेसूमल वासवानी आणि त्याचा मुलगा हितेश वासवानी या दोघांविरुद्ध लाचलुचपत

वासवानी पिता पुत्राने जमविली अपसंपदा
एसीबीच्या चौकशीत उघड : जरीपटक्यात गुन्हे दाखल
नागपूर : पदाचा दुरुपयोग करून लाखोंची मालमत्ता जमविल्याप्रकरणी नागपूर सुधार प्रन्यासचा माजी अधीक्षक अभियंता नानक पेसूमल वासवानी आणि त्याचा मुलगा हितेश वासवानी या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हे दाखल केले.
नासुप्रमध्ये कार्यरत असताना उघड आरोप आणि तक्रारी होत असल्यामुळे वासवानी कमालीचा वादग्रस्त झाला होता. या पार्श्वभूमीवर, वासवानी याला एसीबीने लाच घेताना रंगेहात पकडले होते.
वासवानी याने गैरप्रकार करून प्रचंड मालमत्ता जमवितानाच त्याचा मुलगा हितेश याच्याही फायद्याचे अनेक सौदे केले होते. प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यासाठी संबंधित मंडळी नानक वासवानीसोबतच त्याचा मुलगा हितेश यालाही खूश ठेवत होते. दरम्यान, वासवानीला एसीबीने पकडल्यानंतर त्याने केलेल्या अनेक घोटाळ्यांचे धागेदोरेही तपास यंत्रणेच्या हाती लागले. त्यामुळे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी वासवानी पिता-पुत्रांची उघड चौकशी सुरू केली.
पॉलिसीचे कमिशन २० लाख
हितेश एलआयसी एजंट म्हणून काम करायचा. नानक वासवानी खूश राहावे म्हणून एक कंत्राटदार हितेशकडून मोठ्या रकमेच्या दोन दोन पॉलिसी काढत होता. अशाप्रकारे हितेशला पॉलिसीच्या कमिशनपोटी १९ लाख काही हजारांची रक्कम मिळाली होती. दरम्यान, वासवानी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हे दाखल झाले असले तरी या दोघांना लगेच अटक होणार नाही. त्यांची उद्यापासून कधीही चौकशी (समोरासमोर विचारपूस) सुरू होऊ शकते. सध्याच्या चौकशीत वासवानी पितापुत्राकडे आढळलेली अपसंपदा ‘किरकोळ’ असून, यापेक्षा त्यांच्याकडे कितीतरीपट जास्त अपसंपदा असल्याची जोरदार चर्चा आहे. या सर्वच प्रकाराची चर्चा झाल्यानंतर अटकेची कारवाई होईल.