वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांची घोषणा; १८ रोजी वितरण
By Admin | Updated: August 11, 2015 03:11 IST2015-08-11T03:11:18+5:302015-08-11T03:11:18+5:30
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मृती कर्तबगार शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि जलसंधारण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून राज्यातील आठ शेतकरी

वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांची घोषणा; १८ रोजी वितरण
पुसद : हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मृती कर्तबगार शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि जलसंधारण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून राज्यातील आठ शेतकरी आणि तीन कृषी शास्त्रज्ञांना १८ आॅगस्ट रोजी पुसद येथे आयोजित वसंतराव नाईक स्मृतिदिन सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे.
येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात दुपारी १२.१५ वाजता हा कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी कृषी व महसूलमंत्री एकनाथराव खडसे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. केशव राजकांती राहणार आहेत. या कार्यक्रमात एका एकरात सहा लाखांच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चिंबळी येथील सीमा चंद्रकांत जाधव, सहा एकरात केळी आणि स्ट्रॉबेरीचे १४ लाखांचे उत्पादन घेणारे पुणे जिल्ह्यातीलच केळवडे येथील संतोष पांडुरंग कोल्हे, आंबा कोकम प्रक्रिया आणि मसाले पिकापासून सहा एकरांत दहा लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथील स्नेहा बाळकृष्ण बापट, भाजीपाला व फूल शेतीतून सात एकरांत आठ लाखांचे उत्पन्न घेणारे रायगड जिल्ह्यातील नागाव येथील प्रकाश शांताराम ठाकूर, आंबा, मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू रोपवाटिकेतून ७० लाखांचे निव्वळ उत्पन्न घेणारे जळगाव जिल्ह्यातील गारखेडा येथील रवींद्र माधवराव महाजन, केशर आंबा, सीताफळ, डाळिंब आदी फळबागांपासून २५ लाखांचे निव्वळ उत्पन्न घेणारे जालना जिल्ह्यातील नळविहिरा गावचे संजय दामोधर मोरे, एक एकर गुलाब शेतीतून व नऊ एकर केळीपासून १५ लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सवना येथील लक्ष्मीबाई बापूजी पारवेकर आणि पाच एकरात तुरीची ठिबक सिंचनावर लागवड करून एकरी १३ क्ंिवटल उत्पादन घेणारे अकोला जिल्ह्यातील मघापुरी येथील सुधाकर बाणाईत यांचा गौरव करण्यात येणार आहे.
वसंतराव नाईक कृषी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी तूर उत्पादन वाढीचे प्रयोग व तुरीचे नवीन वाण यासाठी औरंगाबाद येथील डॉ. सूर्यकांत बापूराव पवार आणि बियाणे तंत्रज्ञानासाठी राहुरी येथील डॉ. विजय रामदास शेलार यांचा गौरव करण्यात येईल. तसेच वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कारासाठी विजयकुमार इंगळे, विभागीय कृषी सहसंचालक पुणे यांची निवड करण्यात आली आहे. या नावांची घोषणा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आमदार मनोहरराव नाईक, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर यांच्या मार्गदर्शनात वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी केली.
पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर दुपारी ३.१५ ते ६ या वेळात पुरस्कारप्राप्त शेतकरी व शास्त्रज्ञांचे अनुभव कथन होईल. या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख मार्गदर्शक आमदार मनोहरराव नाईक, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, माजी मंत्री अविनाश नाईक, स्वागताध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर, सचिव डॉ. उत्तम रुद्रवार यांनी केले. (प्रतिनिधी)