वासनकरने वाटली खासगी व्यक्तींना कोट्यवधीची ‘खैरात’

By Admin | Updated: August 7, 2014 00:56 IST2014-08-07T00:56:59+5:302014-08-07T00:56:59+5:30

आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा प्रबंध संचालक आरोपी प्रशांत वासनकर याने खासगी व्यक्ती आणि कंपन्यांना

VasanKarna felt 'billiards' for billions of people | वासनकरने वाटली खासगी व्यक्तींना कोट्यवधीची ‘खैरात’

वासनकरने वाटली खासगी व्यक्तींना कोट्यवधीची ‘खैरात’

नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा प्रबंध संचालक आरोपी प्रशांत वासनकर याने खासगी व्यक्ती आणि कंपन्यांना कोट्यवधीची ‘खैरात’ वाटली, अशी धक्कादायक माहिती बुधवारी सरकार पक्षाकडून आरोपींच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी करताना एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. मुळे यांच्या न्यायालयात देण्यात आली.
दरम्यान न्यायालयाने प्रशांत वासनकर आणि अभिजित चौधरी या दोघांच्या पोलीस कोठडीत आणखी ८ आॅगस्टपर्यंत वाढ केली. या आरोपींच्या आणखी तीन दिवसपर्यंत वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी करताना न्यायालयाला अशी माहिती देण्यात आली की, वासनकर वेल्थचे एचडीएफसी बँकेतील खाते तपासण्यात आले. या खात्यातून २०१२ मध्ये १ कोटी ४० लाख रुपये खासगी अकादमीला देणगीच्या स्वरूपात देण्यात आले. मे - आॅक्टोबर २०१३ दरम्यान अनिल सावरकर याच्या सिग्नेचर रियालेटस् कंपनीला ७८ लाख रुपये देण्यात आले. आॅगस्ट २०१३ मध्ये कल्म्युनेटिंग फायनान्स कंपनीला ३५ लाख, नोव्हेंबर २०१२ ते जून २०१३ पर्यंत ए.सी. चोक्सी कंपनीला ४ कोटी, आॅक्टोबर २०१३ मध्ये अविनाश भुते नावाच्या व्यक्तीला २ कोटी ३० लाख, आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१३ मध्ये निर्मल उज्ज्वल बँकेला १ कोटी २० लाख, आयएसी सेक्युरिटीला ६३ लाख, याच खात्यातून खुद्द प्रशांत वासनकर याने फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०१३ पर्यंत ४ कोटी ८५ हजाराची रक्कम घेतली. या रकमेतून गुन्ह्यातील इतर आरोपी अभिजित चौधरी याच्या खात्यात ५४ लाख ५० हजार रुपये तसेच अनिल सावरकर याला १ कोटी १० लाख रुपये वर्ग करण्यात आले. तसेच एप्रिल-मे २०१२ दरम्यान प्रशांत वासनकरची दुसरी कंपनी ओम भगवती कॅपिटलला २ कोटी १८ लाख १६ हजार रुपये वर्ग करण्यात आले. वासनकरने अशी एकूण १० कोटींपेक्षा अधिक रक्कम विविध कंपन्या आणि खासगी व्यक्तींना दिली. वासनकर वेल्थच्या अ‍ॅक्सीस बँकेतील खात्याचे अवलोकन करण्यात आले असता प्रशांत वासनकरची दुसरी कंपनी ओम भगवती कॅपिटलला ६ आॅक्टोबर २०१२ रोजी ७७ लाख ७६ हजार रुपये देण्यात आले. २८ मार्च २०१३ रोजी कल्म्युनेटिंग फायनान्स कंपनीला १० लाख रुपये देण्यात आले. खासगी मेडिकल ट्रस्टला १ कोटी, एटीएस प्रॉपर्टी ब्युरोला ५० लाख आणि मुंबई कांदीवलीच्या इसाद इंडिया नावाच्या कंपनीला ४० लाख रुपये देण्यात आले. याच वासनकर वेल्थच्या आयडीबीआय बँकेच्या लक्ष्मीनगर येथील खात्यातून अविनाश भुते याला १ कोटी ४० लाख रुपये देण्यात आले. सुधाकर भारंबे आणि इतर व्यक्तींनाही मोठ्या रकमा देण्यात आल्या, हे सर्व या कंपनीचे एजंट आहेत.
‘फादर आॅफ दि चिटर’
आरोपी प्रशांत वासनकर हा सर्व ठकबाजांचा ‘फादर आॅफ चिटर’ आहे, असे वक्तव्य पीडित गुंतवणूकदारांची बाजू मांडताना अ‍ॅड. बी.एम. करडे यांनी करताच भरगच्च न्यायालयात हंशा पिकला. श्रीसूर्या प्रकरणाचा दाखला देताना ते म्हणाले की, श्रीसूर्यातील कविता गडेकर नावाच्या एका कर्मचारी महिलेने पोलिसांकडे आपले बयाण नोंदवलेले आहे. त्यात तिने प्रशांत वासनकर याने खुद्द श्रीसूर्याच्या कार्यालयात दोन महिनेपर्यंत कर्मचारी आणि एजंटांना ठेवी कशा स्वीकारायच्या, चेक आणि व्हाऊचर कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण दिल्याचे म्हटलेले आहे, असे त्यांनी सांगितले. न्यायालयात सर्व बाजू ऐकून दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत ८ आॅगस्टपर्यंत वाढ केली. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख , फिर्यादी पाठक यांच्या वतीने अ‍ॅड. वंदन गडकरी, अ‍ॅड. गजेंद्र सावजी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: VasanKarna felt 'billiards' for billions of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.