वीस बोगस डॉक्टरांवर वसई-विरारला कारवाई
By Admin | Updated: July 31, 2016 03:06 IST2016-07-31T03:06:03+5:302016-07-31T03:06:03+5:30
कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकाट सोडल्याचे वृत्त दिल्यानंतर वसई विरार पालिकेच्या आरोग्य खात्याने बोगस डॉक्टरांच्या मुस्क्या आवळायला सुरुवात केली

वीस बोगस डॉक्टरांवर वसई-विरारला कारवाई
विरार : बोगस डॉक्टरांची यादी तयार होऊन एक वर्षे होत आले तरी कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकाट सोडल्याचे वृत्त दिल्यानंतर वसई विरार पालिकेच्या आरोग्य खात्याने बोगस डॉक्टरांच्या मुस्क्या आवळायला सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसात २० बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली.
वसई विरार पालिका हद्दीत असंख्य बोगस डॉक्टर खुले आम धंदा करीत आहेत. बोगस डिग्री असलेल्या काही जणांनी तर हॉस्पीटल ही थाटली आहेत. पालिकेच्या आरोग्य खात्याने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ५१ बोगस डॉक्टरांची यादी तयार केली होती. मात्र, कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले गेल्या आठ महिन्यांपासून बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई होत नव्हती.
याप्रकरणी गेल्या आठवड्यात लोकमतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश दिले होते. गेल्या चार दिवसात पालिकेच्या आरोग्य खात्याने पोलिसांच्या मदतीने २० बोगस डॉक्टरांवर केली आहे. (वार्ताहर)