श्रमदानातून गेली ४६ आठवडे वर्सोवा चौपाटीची स्वच्छता मोहीम
By Admin | Updated: August 29, 2016 00:38 IST2016-08-28T23:15:17+5:302016-08-29T00:38:14+5:30
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, मार्वे आणि गोराई या मुंबईची शान असलेल्या प्रमुख ६ चौपाट्या जणू कचराकुंड्या झाल्या

श्रमदानातून गेली ४६ आठवडे वर्सोवा चौपाटीची स्वच्छता मोहीम
मनोहर कुंभेजकर,
मुंबई, दि. 28 - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, मार्वे आणि गोराई या मुंबईची शान असलेल्या प्रमुख ६ चौपाट्या जणू कचराकुंड्या झाल्या असून त्यांची दैनावस्था झाली आहे. पालिका प्रशासन जरी या चौपाट्यांच्या स्वछतेवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असले तरी या चौपाट्या लोकसहभाग आणि श्रमदानातून चांगल्या प्रकारे चकाचक होतात हे वर्सोवा चौपाटीच्या माध्यमातून वेसावकरांनी गेली ४६ आठवडे दाखवून दिले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वच्छता मोहिमेचे आवाहन केले असले तरी वर्सोवा रेसिडेन्ट व्हॉलेंटियर्सच्या (व्हीआरव्ही) व वेसावे कोळी जमात रिलीजस आणि चँरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली ४६ आठवडे दर शनिवार आणि रविवारी सकाळी १० ते १२ यावेळेत सुमारे २०० ते २५० कार्यकर्ते वर्सोवा चौपाटीची स्वच्छता करतात. व्हीआरव्हीचे अँड.आफ्रोज शाह,अभिनेते संजय सुरी,मोना केसवानी या प्रमुख कार्यकर्त्यांचा या मोहिमेत सातत्याने पुढाकार असतो.मरोळ बाजार समितीच्या राजश्री भानजी यांचा सुद्धा या मोहिलेला सहकार्य असून इतर कोळी वाड्यातील महिला मंडळसुद्धा या मोहिमेत सहभागी होण्यास उत्सुक्त असल्याची माहिती व्हीआरव्हीच्या सदस्यांनी दिली.
विशेष म्हणजे काल आणि आज पाऊस असतांना देखिल या संस्थच्या २५० कार्यकर्त्यांनी येथील चौपाटीची स्वच्छता करून काल आणि आज ९५००० किलो कचरा गोळा केला.काल सुमारे ४८००० किलो प्लास्टिक जमा झाले होते.पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी देखिल या स्वच्छता मोहिमेला मोलाचे सहकार्य करून पालिकेतर्फे २ जेसीबी,२ ट्रँक्टर,२ वजनकाटे,५ डम्पर्स आणि पालिकेचे ३० कर्मचारी आदी साधन सामुग्री त्यांनी उपलब्ध करून दिली अशी महिती वेसावे कोळी जमात रिलीजस आणि चँरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मनीष भुनगवले आणि सदस्य राजहंस टपके यांनी दिली.आपला वैद्यकीय व्यवसाय साभाळून मढ-वेसावे येथील डॉ.चारूल भानजी सुद्धा आरोग्यासाठी स्वछता कशी महत्वाची आहे याचे महत्व पटवून देत आहेत.
विशेष म्हणजे या स्वछता मोहिमेत नॉर्वेच्या काऊसीलेट जनरलने भाग घेऊन या मोहिमेचे कौतुक केले अशी माहिती सिंहगड इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेचा माजी विद्यार्थी मोहित रामले याने दिली.या स्वच्छता मोहिमेत वाळूत २ फूट खोल कचऱ्याचा ढिगामध्ये प्लास्टिक, बँग, चादरी, गोण्या, जुने कपडे, बूट दर शनिवार आणि रविवारी सापडतात. हा सर्व कचरा या स्वच्छता मोहिमेपूर्वी मातीत गाडला गेला आहे.इतर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे असे मत त्याने व्यक्त केले.या शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.स्मृतीरंजन मोहंती यांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले अशी माहिती एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या येथील विद्यार्थ्यांनी दिली.
एकेकाळची वेसावकरांची शान असलेली वेसाव्याची खाडी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे.शिवाय लोखंडवाला,गोरेगांव,मालाड येथील परिसरात १२-१३गटारे आहेत त्यातील दूषित पाणी,प्लास्टिक पिशव्या आणि रासायनिक कारखान्यातील प्रक्रिया न केलेले पाणी वेसावे खाडीत सोडण्यात येते.त्यामुळे परिणामी येथील वेसावे खाडी कालवंडलेली असून येथील गेली विपरीत परिणाम येथील मासेमारीवर झाला आहे अशी माहिती वेसावा नाखवा मंडळ(ट्राँलर्स)चे अध्यक्ष देवेंद काळे आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज चंदी यांनी दिली.
सोशल मिडीयावरून व्हायरल झालेल्या वर्सोव्यातील रहिवाशांच्या व स्थानिक कोळी समाजाच्या चौपाटी स्वच्छतेच्या मोहिमेची दखल थेट संयुक्त राष्ट्रांच्या लेव्हीस पग या प्रतिनिधींनी घेतली आहे.श्रमदानातून यशस्वी होत असलेल्या वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेच्या पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अकरा प्रतिनिधिनी गेल्या ५ आणि ६ ऑगस्टला वर्सोवा चौपाटीला भेट देऊन या मोहिमेत भाग सुद्धा घेतला होता अशी माहिती जमातीचे मानद सचिव जयंत भावे आणि खजिंनदार शांताराम धाको यांनी दिली. स्थानिक कोळी बांधवांनी लाँचमधून संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधींना वर्सोवा खाडीत फिरवून आणले. त्यावेळी लाँचमधून समुद्रात मासेमारीची जाळी टाकली.या जाळ्यांमध्ये फक्त कचरा, प्लास्टिक, बिस्किटांच्या व वेफर्सच्या पुड्यांची आवरणेच अडकली. एकही मासा जाळीत अडकला नाही. पूर्वी अर्धा तास मासेमारी केली तरी दोन दिवसांचे मासे मिळत होते, असा अनुभव ६८वर्षीय जेष्ठ नागरिक श्री.कृष्णा हरी साठी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधींना दिली.