वेकोलिची ग्रेडर मशीन खाणीत कोसळली
By Admin | Updated: August 17, 2014 00:45 IST2014-08-17T00:45:49+5:302014-08-17T00:45:49+5:30
वेकोलिच्या माजरी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवीन कुनाडा कोळसा खाणीतील दरीत ग्रेडर मशीन कोसळल्याने आॅपरेटरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

वेकोलिची ग्रेडर मशीन खाणीत कोसळली
आॅपरेटरचा मृत्यू : नवीन कुनाडा कोळसा खाणीतील दुर्घटना
माजरी (चंद्रपूर): वेकोलिच्या माजरी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवीन कुनाडा कोळसा खाणीतील दरीत ग्रेडर मशीन कोसळल्याने आॅपरेटरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
रुदल विश्वनाथ यादव (५४) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे ग्रेडर मशीनच्या सहाय्याने खाणीत काम करीत होते. खाणीतील उताराच्या रस्त्यावर मशीन मागे घेत असताना अचानक ब्रेक निकामी झाले. त्यामुळे मशीन उताराच्या दिशेने वेगाने पुढे गेली. परिणामी यादव यांना उडीदेखील मारता आली नाही. ही मशीन १५० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. या दुर्दैैवी अपघातात यादव यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, वेकोलिचे अधिकारी, खाण कामगार व कामगार नेत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. कामगारांनी दरीत उतरून रुदल यादव यांचा मृतदेह बाहेर काढला. या अपघाताचे नेमके कारण काय, याची चौकशी कंपनीकडून केली जात आहे. मृत यादव भद्रावती येथील पिपरबोडी वार्डातील रहिवासी आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. (वार्ताहर)