सिंहस्थामध्ये पर्जन्याभिषेकात वैष्णवमेळा
By Admin | Updated: September 19, 2015 02:45 IST2015-09-19T02:45:29+5:302015-09-19T02:45:29+5:30
पहाटेपासून अखंड कोसळणाऱ्या जलधारांमध्ये नाशिकमधील तिसऱ्या व अखेरच्या पर्वणीत गोदातटी वैष्णव साधू-महंतांसह लाखो भाविकांनी अत्यंत उत्साहात स्नान केले.

सिंहस्थामध्ये पर्जन्याभिषेकात वैष्णवमेळा
नाशिक : पहाटेपासून अखंड कोसळणाऱ्या जलधारांमध्ये नाशिकमधील तिसऱ्या व अखेरच्या पर्वणीत गोदातटी वैष्णव साधू-महंतांसह लाखो भाविकांनी अत्यंत उत्साहात स्नान केले. पर्जन्याभिषेकात रंगलेल्या या पर्वणीबरोबरच नाशिकमधील यंदाच्या कुंभमेळ्याचा अध्याय सुफळ संपूर्ण झाला.
सर्वांचेच प्रमुख आकर्षण असलेली साधू-महंतांची मिरवणूक सकाळी ६ वाजता तपोवनातील साधुग्रामच्या लक्ष्मीनारायण मंदिरापासून निघाली.
आखाड्याचे ध्वज, निशाण नाचवत, इष्टदेवतांचा मान सांभाळत साधूंनी रामकुंडाच्या दिशेने प्रयाण केले. गेल्या वेळेप्रमाणेच यंदाही मिरवणुकीच्या अग्रभागी निर्मोही आखाडा होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, महापौर अशोक मुर्तडक, श्री गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी साधू-महंतांचे स्वागत केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तिन्ही पर्वण्यांमध्ये सुमारे एक कोटीपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावली, असा दावा कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. (प्रतिनिधी)
मंदिर फक्त दोन तास बंद
येत्या ३० सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील श्री भगवान त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी २२ तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देवस्थान विश्वस्त व प्रांत अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.