वैष्णवांचा मेळा मल्हारनगरीत विसावला

By Admin | Updated: July 4, 2016 01:47 IST2016-07-04T01:47:25+5:302016-07-04T01:47:25+5:30

जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाचे नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने आज सायंकाळी ५ वाजता प्रवेश केला

The Vaishnavite Mela resides in Malharangar | वैष्णवांचा मेळा मल्हारनगरीत विसावला

वैष्णवांचा मेळा मल्हारनगरीत विसावला


जेजुरी : महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाचे नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने आज सायंकाळी ५ वाजता प्रवेश केला. जेजुरीकरांनी भंडाऱ्याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी टाळमृदंगाच्या गजराने जेजुरीनगरी दुमदुमली. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबऱ्याची उधळण करीत गडकोटात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ आणि ‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात दर्शन घेतले.
‘जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा
पोटा येता हरले पापा, ज्ञानदेवा मायबापा’
या तुकारामांच्या ओवीच्या सुरात दिंडीकरी वैष्णव झपझप पावले टाकीत खंडोबाची जेजुरी जवळ करीत होता. संपूर्ण ढगांनी आच्छादलेले आभाळ, अधूनमधून येणारी पावसाची सर, दिंडी-दिंडीतून येणारे अभंग, भूपाळी, वासुदेव, गौळणी, आंधळे, पांगळे, गुरुपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग आदींचे सूर संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि उत्साह निर्माण करीत होते.
भारावल्याप्रमाणे वारकरी नाचत गात जेजुरीकडे येत होते. थंड व आल्हाददायक वातावरणातही रस्त्यात आजूबाजूच्या शेतकरीवर्गाने वारकऱ्यांसाठी आणलेली भाजी-भाकर वैष्णवांना मायेची ऊब देत होती.
संत सोपानकाकांच्या सासवडनगरीत नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या हस्ते माऊलींची नित्य महापूजा उरकल्यानंतर निरोप घेऊन पालखी सोहळ्याने सकाळी ८ वाजता जेजुरीकडे प्रस्थान केले. ज्ञानोबा माऊलींच्या गजरात सोहळा जेजुरीकडे येत असताना बोरवकेमळा येथील न्याहारी, पुढे शिवरी येथील दुपारची विश्रांती, त्याचबरोबर साकुर्डे येथील विसावा उरकून सायंकाळी ५ वाजता मजल-दरमजल करीत सोहळा जेजुरीत पोहोचला. आज पहाटेपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती. या पावसातच वैष्णवांचा मेळा टाळ-मृदंगाच्या तालात मुखाने ‘ज्ञानोबा तुकाराम’चा गजर करीत जेजुरीकडे निघाला होता. सासवड येथून पालखी सोहळ्याचे प्रस्थान होण्यापूर्वीच गेले महिनाभरापासून या परिसराचा अंत पाहणाऱ्या पर्जन्यराजाच्या आगमनाने या परिसरात उत्साह दुणावला होता. ठिकठिकाणी माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
सोहळ्याने जेजुरीनगरीत प्रवेश करताना पालखी रथापुढील दिंड्यातून ‘ज्ञानोबा तुकाराम’चा गजर आणि अवघ्या महाराष्ट्राच्या कुलदैवताचा जयघोष करीतच तीर्थक्षेत्र जेजुरीनगरीत एकामागून एक प्रवेश करीत होत्या. जेजुरीच्या नगराध्यक्षा सुरेखा सोनवणे, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, उपनगराध्यक्ष लालासाहेब जगताप, नगरसेवक जयदीप बारभाई, नगरसेविका साधना दिडभाई, ज्ञानेश्वरी बारभाई, साधना दरेकर, त्याच बरोबर मार्तंड देवसंस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. दशरथ घोरपडे, किशोर म्हस्के, संदीप घोणे, सुधीर गोडसे, वसंत नाझिरकर, डॉ. प्रसाद खंडांगळे यांनी सोहळ्याचे पुष्पवृष्टी आणि भंडाऱ्याची उधळण करीत स्वागत केले. दररोज अबीरबुक्यात न्हाऊन निघणारा सोहळा जेजुरीत पिवळ्या जर्द भंडाऱ्यात न्हाऊन निघाला. जेजुरीनगरीच्या पूर्वेला माऊलींचा पालखी सोहळा औद्योगिक वसाहतीनजीक पालखीतळावर पोहोचला. शहरापासून दूर असल्यामुळे अनेक भाविकांनी माऊलींचे दर्शन याच ठिकाणी घेतले. सायंकाळी ६ वाजता माऊलींचा पालखी सोहळा समाज आरतीनंतर मल्हारनगरीत गडाच्या पूर्वेला विसावला.
माऊलींचे जेजुरीत आगमन होत असल्याने सोहळ्यातील लाखो भाविकांना वारी सुकर जावी म्हणून ठिकठिकाणी साकुर्डे फाटा येथे कल्याण भिवंडी येथील वारकरी सेवा ट्रस्ट, जेजुरीत जैन पटेल बंधू टिंबर मार्केट पुणे, मार्तंड देवसंस्थान, योगक्षेम प्रतिष्ठान, तसेच स्थानिक विविध संस्था, संघटना, कारखानदाराकडून अल्पोपाहार, फळवाटप, अन्नदान करण्यात आले. समाज आरतीच्या वेळी प्रांत समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, पोलीस अधिकारी तानाजी चिखले, अशोक भरते, मुख्याधिकारी समीर भूमकर आदींनी सोहळाप्रमुखांची भेट घेऊन नियोजनाची माहिती घेतली. पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने प्रशासनाकडून येथे खडी, मुरूम टाकून राडारोडा बुजवण्याचे काम केले असले तरीही पावसाचा दुपारपर्यंत जोर राहिल्याने संपूर्ण पालखीतळावर मुरूम टाकले होते.

Web Title: The Vaishnavite Mela resides in Malharangar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.