वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय असलेल्या निलेश चव्हाण याचंही नाव समोर आलं आहे. वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींना धमकी दिल्याचे उघड झाल्यापासून तो फरार आहे. दरम्यान, या निलेश चव्हाणचे कारनामेही समोर येत असून, त्याच्याकडे असलेली बंदूक जप्त करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली असता पोलिसांना बंदूक सापडली नाही. मात्र निलेश चव्हाणचा लॅपटॉप हाती लागला असून, त्यात पत्नीसह इतर मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे.
मृत वैष्णवी हगवणे हिच्या माहेरच्या नातेवाईकांना धमकी देताना निलेश चव्हाण याने बंदुक दाखवली होती. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या बंदुकीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरी धडक दिली होती. मात्र ही बंदूक काही पोलिसांच्या हाती लागली नाही. पण त्याच्या घरातून एक लॅपटॉप पोलिसांच्या हाती लागला. या लॅपटॉपमध्ये निलेश चव्हाण याच्या पत्नीसह इतर मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या निलेश चव्हाणचं 2018 मध्ये लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या सहा महिन्यांतच निलेशच्या पत्नीला त्याच्यावर शंका यायला सुरुवात झाली. आणि याला कारण ठरले – घरात सापडलेले स्पाय कॅमेरे. निलेश चव्हाणच्या पत्नीला घरातील सीलिंग फॅनला आणि एसीला काहीतरी संशयास्पद वस्तू चिकटवलेल्या दिसल्या. तिने याविषयी निलेशकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर घरात सातत्याने अशा प्रकारच्या संशयास्पद वस्तू दिसू लागल्या. पत्नीने विचारणा केल्यानंतर तो टाळाटाळ करायचा, माहिती लपवायचा. आणि तेच पत्नीला कुठेतरी संशय येण्यास कारणीभूत ठरलं. एके दिवशी, जेव्हा निलेश घरात नव्हता, तेव्हा तिने त्याचा लॅपटॉप उघडला आणि तिला धक्काच बसला होता.
त्या लॅपटॉपमध्ये निलेशने स्वतःच्याच पत्नीसोबत शरीर संबंध ठेवतानाचा व्हिडिओ आढळून आला. आणि त्यानंतर त्याच्या पत्नीला घरात सापडलेल्या त्या संशयास्पद वस्तूंचा उलगडा झाला. त्या वस्तू दुसरं-तिसरं काही नसून स्पाय कॅमेरे होते. निलेश पत्नीसोबत जेव्हा बेडरूममध्ये असायचा, तेव्हा तो लाईट सुरू ठेवायचा आणि स्पाय कॅमेराच्या मदतीने शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. त्याच्या त्या लॅपटॉपमध्ये पत्नीला आणखी काही महिलांसोबतचे अशाच प्रकारचे अश्लील व्हिडिओही दिसून आले होते.