विदर्भात वाघ तस्करांची बहेलिया टोळी सक्रिय!
By Admin | Updated: January 20, 2015 01:52 IST2015-01-20T01:52:51+5:302015-01-20T01:52:51+5:30
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत वाघांची शिकार करण्यासाठी मध्य प्रदेशातील बहेलिया टोळी सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली़ विशेषत: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला या टोळीने लक्ष्य केले

विदर्भात वाघ तस्करांची बहेलिया टोळी सक्रिय!
गणेश वासनिक - अमरावती
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत वाघांची शिकार करण्यासाठी मध्य प्रदेशातील बहेलिया टोळी सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली़ विशेषत: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला या टोळीने लक्ष्य केले असून, त्यांच्याकडे असलेल्या अत्याधुनिक शस्त्रसाठ्यामुळे वन विभाग हतबल झाल्याचे चित्र आहे. ही टोळी वाघांची शिकार करण्यासाठी घोरपडीची मदत घेत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
व्याघ्रगणना होऊन बराच अवधी लोटला आहे. देशभरात वाघांची आकडेवारी २५ जानेवारीनंतर स्पष्ट होईल. एकीकडे वाघांच्या वाढत्या संख्येविषयी उत्सुकता असताना राज्यात वाघांच्या शिकारीच्या उद्देशाने मध्यप्रदेशातील बहेलिया टोळीने पाय पसरले आहेत. मेळघाटात या टोळीने अत्याधुनिक शस्त्रसाठा, शिकारीचे पाठबळ, संवादासाठी नेटवर्क तसेच वाघांच्या शिकारीसाठी प्रशिक्षित घोरपडसुद्धा सोबत आणल्याची माहिती आहे. पेंच, ताडोबा, नागझिरा, बोर, टिपेश्वर व मेळघाट व्याघ्र प्रकल्पांना या टोळीने लक्ष्य केले असून, वाघांच्या अधिवासाची माहिती घेतली आहे. रामटेक, बऱ्हाणपूर, उमरेड व नागपूर हे या टोळीचे प्रमुख केंद्र असल्याचे वनविभागाला मिळालेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले़
भुसावळ, नांदेडमार्गे कातड्याची तस्करी
डोंगरदऱ्यात अथवा उंच भागात वाघ असल्याची माहिती मिळताच ही टोळी घोरपडीला दोरी बांधून सोडतात. त्यानंतर वाघांच्या वास्तव्याचा शोध घेतला जातो. ठिकाण स्पष्ट झाले, की लोखंडी ट्रॅपने वाघांची शिकार केली जाते. भुसावळ, नांदेडमार्गे रेल्वेने वाघांच्या कातड्याची तस्करी होत असल्याची माहिती आहे.
विक्रीचे प्रमुख केंद्र चीन
वाघांची शिकार केल्यानंतर ही टोळी कातडे रेल्वेने पाठविते. अलाहाबाद येथे चामडे पाठविण्यासाठी महिलांची मदत घेतली जाते. वाघांच्या कातड्याचा व्यवहार हा अलाहाबाद येथे झाल्यानंतर पुढे हे कातडे चीनमध्ये पाठविले जाते. वाघाच्या कातडीसाठी तस्करांना २५ ते ३० लाख रुपये मिळत असल्याची माहिती आहे.
बहेलिया टोळी मेळघाटात दाखल झाली असेल तर ही गंभीर बाब आहे. या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. प्रसंगी राज्य राखीव दलाची मदत घेतली जाईल.
- दिनेश त्यागी, क्षेत्र संचालक,
मेळघाट व्याघ्र प्रकल्प