समस्या दूर करण्यासाठी तंत्रज्ञान वापरावे
By Admin | Updated: May 7, 2017 03:11 IST2017-05-07T03:11:45+5:302017-05-07T03:11:45+5:30
तंत्रज्ञान हे उच्चभ्रूंनी केवळ मिरविण्यासाठी नसते, समस्या दूर करण्यासाठी ते असते. वंचितांचे आयुष्ये प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर

समस्या दूर करण्यासाठी तंत्रज्ञान वापरावे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तंत्रज्ञान हे उच्चभ्रूंनी केवळ मिरविण्यासाठी नसते, समस्या दूर करण्यासाठी ते असते. वंचितांचे आयुष्ये प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, अशी अपेक्षा टेलिकम्युनिकेशन क्रांतीचे प्रणेते सॅम पित्रोदा यांनी
व्यक्त केले.
मॅक्सेल फाउंडेशनतर्फे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सुपर रेलिगेअर लॅबोरेटरिज लि़ चे अध्यक्ष डॉ. अविनाश फडके, शिवराय टेक्नॉलॉजीज प्रा़ लि़ चे सीईओ संजय बोरकर व संतोष शिंदे, चेतना पवार व चित्रा मेटे यांना ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. पुरस्कार निवड समितीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त नितीन पोतदार या वेळी उपस्थित होते.
पित्रोदा म्हणाले की, आज आपल्याकडे फॉर्च्युन५००ची यादी आहे; मात्र चांगले डॉक्टर, चांगले शिक्षक नाहीत. बॉलिवूडची गाणी, आयपीएल कल्चर आणि सोशल मीडियावरची टिवटिव यांनी नवा भारत घडणार नाही. प्रयोगशाळेतूनच घडेल.
जैन म्हणाले की, शेतकऱ्यांना उच्च कृषी तंत्रज्ञान पुरवून त्यांच्या उत्पन्नात भर घालण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मिळालेला हा पुरस्कार मी शेतात राबणाऱ्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांना अर्पण करीत आहे़
कर्णिक म्हणाले की, आता ज्ञानाचे रूपांतर उपयोजनात करण्याची गरज आहे. बदलत्या काळात तुमचे वेगळेपण हिच ताकद ठरणार आहे.
केतकर यांनीही मनोगत व्यक्त केले. पोतदार यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद केली. अजित भोळे यांनी सूत्रसंचालन केले़