नगर परिषद कर्मचाऱ्यांचा उद्याचा बेमुदत संप अटळ
By Admin | Updated: July 14, 2014 03:43 IST2014-07-14T03:43:31+5:302014-07-14T03:43:31+5:30
राज्यातील २३५ नगर परिषदांमधील ७० हजार कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जात आहेत.

नगर परिषद कर्मचाऱ्यांचा उद्याचा बेमुदत संप अटळ
मुंबई : राज्यातील २३५ नगर परिषदांमधील ७० हजार कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जात आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांवर साधी चर्चा करण्याचे औदार्यही नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दाखविलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कायम सेवेतील आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांनी संघर्ष समिती स्थापत संपाचा पवित्रा कायम ठेवला.
गेल्या सहा महिन्यांपासून वेतन आणि पेन्शन मिळाली नसल्याने कायम सेवेत आणि रोजंदारीवर असलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नगर परिषदांमध्ये वित्तीय तूट निर्माण झाल्याने वेतन आणि पेन्शन थकल्याचा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी केला आहे. शासनाने जकात रद्द करून सहायक अनुदान देण्यास सुरुवात केल्यानंतर ही समस्या उद्भवल्याचे घुगे यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात गेल्या चार महिन्यांत नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्यासोबत संघर्ष समितीने तीन बैठका घेतल्या. मात्र त्यात तोडगा निघू शकलेला नाही. संघटनेने जून महिन्यात केलेल्या भीक मांगो आंदोलनादरम्यान सामंत यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्री दूरच स्वत: सामंतही शिष्टमंडळाला भेटले नसल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. (प्रतिनिधी)