पुढील ३ दिवसांत बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाचा मारा; हवामान खात्याचा अंदाज
By सचिन लुंगसे | Updated: April 10, 2024 21:02 IST2024-04-10T21:02:13+5:302024-04-10T21:02:19+5:30
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे

पुढील ३ दिवसांत बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाचा मारा; हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : राज्याला बसणा-या उन्हाच्या झळा कायम असून, बुधवारी मालेगावचे कमाल तापमान ४२ अंश नोंदविण्यात आले आहे. उर्वरित शहरेही ३८ अंशावर जाऊन ठेपली असतानाच पुढील ३ दिवसांसाठी राज्यातील बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाचा मारा होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशावर स्थिर असले तरी वाढती आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढत असल्याचे चित्र आहे.
खान्देश, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यात ३ दिवस म्हणजे गुरुवार ते शनिवारपर्यंत मध्यम अवकाळी (वीजा, वारा, गारा ) पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात वातावरण कोरडे राहणार असुन दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दिड डिग्रीने अधिक असेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये
मुंबई ३३
ठाणे ३९.२
मालेगाव ४२
जेऊर ४१.५
बीड ४०.५
सोलापूर ४०
अहमदनगर ३९.८
धाराशीव ३९.५
सातारा ३९.१
सांगली ३८.९
छत्रपती संभाजी नगर ३८.६
परभणी ३८.३
कोल्हापूर ३८.२
जळगाव ३८
नाशिक ३७.८