असंघटित कामगारांचा एल्गार

By Admin | Updated: November 29, 2015 02:47 IST2015-11-29T02:47:28+5:302015-11-29T02:47:28+5:30

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी निर्माण मजदूर संघटना आणि महाराष्ट्र महिला महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद मैदानात शनिवारी मोर्चा काढण्यात

Unorganized Worker's Elgar | असंघटित कामगारांचा एल्गार

असंघटित कामगारांचा एल्गार

मुंबई : सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी निर्माण मजदूर संघटना आणि महाराष्ट्र महिला महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद मैदानात शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्या कामगारांनी या वेळी सरकारविरोधी घोषणा देत आझाद मैदान दणाणून सोडले.
महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आझाद मैदानातील नारायण मेघाजी लोखंडे मंचावर असंघटित आणि असुरक्षित कामगारांची सनद सादर करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय जवांदीया उपस्थित होते. नाका कामगार, कचरा वेचणारे, घरेलू कामगार, बूट पॉलिश कामगार, कंत्राटी कामगार, सफाई कामगार, बांधकाम कामगार, जरी कामगार या संघटनेच्या कामगारांनी या वेळी हजेरी लावली होती.
नाका तिथे शेड उभारणी करा, नाका कामगारांना कोणत्याही अटीशिवाय दिवाळीभेट द्या, सर्व असंघटित कामगारांना ई.एस.आय.सी. योजनेचा लाभ द्या, जिल्हावार कामगार कल्याण मंडळाची स्थापना करून कामगार प्रतिनिधीची नेमणूक करा, अशा मागण्या करण्यात आल्या. (प्रतिनिधी)

राज्य सरकारच्या प्रस्तावावर चर्चेचे आयोजन करण्याची मागणी
किमान वेतन १५ हजारांपेक्षा कमी नसावे, सामाजिक सुरक्षेसाठी किमान निवृत्तिवेतन
३ हजारांपेक्षा कमी नसावे, कामगार प्रशासनांतर्गत राज्य सरकारने प्रस्तुत केलेल्या नियमांवर जनतेसमोर त्रिपक्षीय चर्चेचे आयोजन करावे.
कामगारांना किमान ३०० दिवसांचे काम मिळावे, सरकारच्या घरबांधणी व निवास धोरणाची त्वरित अमंलबजावणी करण्यात यावी आणि वेठबिगारी टाळण्यासाठी प्रत्येक जिल्हयात वेठबिगारी कायदा व सर्वोच्च न्यायालयातंर्गत निग्राणी समितिची स्थापना करावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

Web Title: Unorganized Worker's Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.