ए वन विद्यापीठ!

By Admin | Updated: December 11, 2014 00:35 IST2014-12-11T00:21:26+5:302014-12-11T00:35:30+5:30

नॅक मानांकन : शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा

University of A-One! | ए वन विद्यापीठ!

ए वन विद्यापीठ!

कोल्हापूर : ‘नॅक’च्या कार्यकारी समितीची आज बंगलोर येथे बैठक झाली. त्यानंतर समितीने सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी विद्यापीठास ‘अ’ (ए) मानांकन मिळाल्याचे संकेतस्थळावर जाहीर केले.
या यशबद्दल कुलगुरू डॉ. एन. जे पवार म्हणाले, तिसऱ्या फेरीतील मूल्यांकनासाठी २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘नॅक’ समितीने विद्यापीठाची तपासणी केली. यात समितीने विद्यापीठाचा गेल्या वर्षांतील विविध क्षेत्रांतील कामगिरीचा लेखाजोखा तपासला. मूल्यांकनाच्या दुसऱ्या फेरीत समितीने शिफारशी व सूचना केल्या होत्या. त्यांची पूर्तता तसेच अभ्यासक्रम-पाठ्यक्रमांतील बदल, शिक्षणपद्धती, संशोधन आणि सल्ला, प्रशासन, विद्यार्थ्यांचा विकास, चांगले उपक्रम राबविणे, नावीन्य या निकषांच्या आधारे मूल्यांकनाची विद्यापीठाने तयारी केली होती. त्यामुळे सर्व निकषांमध्ये विद्यापीठाचा ‘रेटिंग स्कोअर’ चांगला आहे.
विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळेल, असा विश्वास होता. गेल्या काही वर्षांपासून सर्वच घटकांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात मिळालेल्या या मानांकनाचा मला विशेष आनंद आहे. विद्यापीठाने पुढील २५ वर्षांच्या वाटचालीचा ‘रोड मॅप’ बनविला आहे. त्याला ‘अ’ मानांकनामुळे बळ मिळाले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. अर्जुन राजगे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डी. के. गायकवाड, डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. व्ही. जे. फुलारी, डॉ. आर. के. कामत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


शुभेच्छांचा वर्षाव
विद्यापीठाला ‘अ’ (ए) मानांकन मिळाल्याचे वृत्त एशिया पॅसिफिक क्वालिटी नेटवर्कचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी कुलगुरू डॉ. पवार यांना दूरध्वनीवरून कळविले. तसेच त्यांनी ही माहिती फेसबुकवर प्रसिद्ध केली. त्यानंतर कुलगुरू डॉ. पवार, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, आदी अधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. माजी कुलगुरू डॉ. रा. कृ. कणबरकर, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डी. आर. माने, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, भालबा विभूते, आदींनी शुभेच्छा दिल्या.




आजपर्यंतचे मानांकन
२००४ : बी प्लस
२००९ : बी
२०१४ : ए




संघटितपणाचे फलित
संशोधनात्मक योगदान, अभ्यासक्रम पुनर्रचना, डॉक्युमेंटेशन सेंटर, अकॅडेमिक रिर्सोस सेंटर व रायटिंग लॅब असे नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यापीठातील सर्व घटकांनी केलेले संघटित कामगिरीचे फलित या मानांकनातून मिळाले आहे.
- डॉ. व्ही. बी. जुगळे, संचालक, अंतर्गत गुणवत्ता कक्ष,
शिवाजी विद्यापीठ

100
कोटींच्या
अनुदानास पात्र
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे युनिव्हर्सिटी प्रोटेन्शियल एक्सलन्स योजनेंतर्गत विद्यापीठाच्या भौतिक सुविधा, संशोधन कार्य, शैक्षणिक उपक्रम अशा सर्वांगीण विकासासाठी शंभर कोटींचे अनुदान दिले जाते. त्यासाठी विद्यापीठाला नॅकचे ‘अ’ (ए) मानांकन ही अट आहे.

Web Title: University of A-One!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.